प्रियांका गांधींचा राजघाटावर राहुलसाठी सत्याग्रह

नवी दिल्ली – काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्यानंतर आज त्यांची बहीण मैदानात उतरली. काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी राजघाटावर पोहोचल्या आणि पोलिसांचे बंदीचे आदेश तोडत त्यांनी सत्याग्रह सुरू केला. त्याचवेळी मोदी सरकारच्या कारवाईवर पुन्हा संताप व्यक्त करीत राहुल गांधी यांनी आज ‘खासदार’ स्टेट्स बदलत ‘रद्दबातल केलेला खासदार’ असे स्टेट्स ठेवले.
दिल्लीत महात्मा गांधी स्मारकावर पोलिसांची परवानगी नसतानाही सत्याग्रहाचा कार्यक्रम काँग्रेसने केला. काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी-वाड्रा आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या नेतृत्वाखाली हा संकल्प सत्याग्रह कार्यक्रम राजघाटाबाहेर झाला. प्रियांका गांधींनी भाषणाची सुरुवातच वडील राजीव गांधींच्या अंत्ययात्रेच्या एका आठवणीपासून केली. त्या म्हणाल्या, ‘32 वर्षांपूर्वी मे 1991 मध्ये माझ्या वडिलांची अंत्ययात्रा त्रिमूर्ती भवनातून निघाली होती. आई आणि राहुलसोबत मी गाडीत होते. पुढे एका सजलेल्या गाडीत माझ्या वडिलांचे पार्थिव होते. थोड्या वेळाने राहुल म्हणाला मला उतरायचे आहे. हट्ट करत तो गाडीतून उतरला आणि सैन्यांच्या ट्रकमागोमाग तो उन्हात आपल्या वडिलांच्या अंत्ययात्रेत चालत चालत राजघाटापर्यंत पोहोचला. या जागेजवळ माझ्या शहीद वडिलांवर माझ्या भावाने अंत्यसंस्कार केले. माझ्या वडिलांचे पार्थिव तिरंग्यात लपेटले होते. या शहीद वडिलांचा अपमान भर संसदेत होतो. त्या शहिदाच्या मुलाला तुम्ही देशद्रोही म्हणता. तुमचे मंत्री माझ्या आईचा अपमान करतात. तुमचे एक मंत्री म्हणतात की, राहुल गांधींना माहितच नाही की त्याचे वडील कोण आहेत. तुमचे पंतप्रधान भर संसदेत उभे राहून बोलतात की हा परिवार नेहरुंचे नाव का नाही लावत? ते आमच्या संपूर्ण कुटुंबाचा अपमान करतात. काश्मिरी पंडितांच्या प्रथेचा अपमान करतात ज्याअंतर्गत मुलगा वडिलांच्या निधनानंतर पगडी परिधान करून परंपरा पुढे नेतो. पण तुम्हाला या अपमानासाठी कोणतीच शिक्षा होत नाही. तुम्हाला दोन वर्षांचीही शिक्षा होत नाही. तुम्हाला कुणी तुरुंगात पाठवत नाही. संसदेतून बाहेर काढत नाही. तुम्हाला निवडणूक लढविण्यापासून कोणी रोखत नाही. का? आम्ही आजपर्यंत सहन करत गेलो. आता गप्प बसणार नाही. माझ्या भावाने तुमची संसदेत गळाभेट घेऊन सांगितले की, मी तुमचा तिरस्कार करत नाही. आमची तिरस्काराची विचारधाराच नाही. मला हे विचारायचे आहे की, एका माणसाचा तुम्ही किती अपमान कराल? हीच आहे का या देशाची परंपरा?’
परिवारवादाच्या सातत्याने होणार्‍या आरोपावरही त्या बोलल्या की, आम्हाला परिवारवादी म्हणता. मग भगवान राम कोण होते, त्यांनी आपल्या कुटुंबासाठी वनवास सोसला, त्यांनी आपल्या कुटुंबासाठी, आपल्या भूमीसाठी आपला धर्म पाळला. ते परिवारवादी होते? पांडव परिवारवादी होते? आणि आमच्या कुटुंबाचे सदस्य या देशासाठी शहीद झाले त्यासाठी आम्हाला शरम वाटली पाहिजे का? माझ्या कुटुंबाने देशासाठी रक्त सांडले आहे. या झेंड्यात त्यांचे रक्त आहे. या देशाच्या लोकशाहीला माझ्या कुटुंबाच्या रक्ताने ताकद दिली आहे. ज्यांना वाटते की, आम्हाला घाबरवून, आम्हाला अपमानित करून, धाडी टाकून आम्हाला घाबरवता येईल तर आम्ही घाबरणार नाही. आम्ही आणखी जोमाने लढू. या देशाच्या लोकशाहीची नीव काँग्रेस पक्षाच्या महापुरुषांनी घातली आहे.
प्रियांका पुढे म्हणाल्या,‘मला कळत नाही की, जनतेला काय झाले आहे. तुमची सर्व संपत्ती लुटून नेत आहेत. मोजक्या उद्योगपतींना सर्व दिले जात आहे. ही राहुल गांधींची संपत्ती नाही. ही तुमची संपत्ती आहे. हे सरकारी उद्योग तुमच्यासाठी बनवले आहेत ते यांना दिले जात आहेत. छोट्या उद्योगांमधून तुमचा रोजगार येतो. अदानीकडून येत नाही. ते तुमचा रोजगार हिसकावून घेतात हे तुमच्या का लक्षात येत नाही. तुम्ही गॅस सिलिंडरसाठी हजार रुपये देता आणि इथे तुमची संपत्ती लुटली जात आहे.’
त्या म्हणाल्या, ‘राहुल गांधीने काय केले? दोन प्रश्नच तर विचारले. पण त्यांची उत्तरे देता आली नाहीत तेव्हा सरकार घाबरले. जे अहंकारी असतात, तानाशाह असतात ते जेव्हा उत्तरे देऊ शकत नाही तेव्हा संपूर्ण सत्तेचा वापर करत प्रश्न विचारणार्‍यांचा आवाज दाबू पाहतात. हे संपूर्ण सरकार, मंत्री एका माणसाला वाचवण्याचा एवढा का प्रयत्न करत आहेत? देशाची संपूर्ण संपत्ती याला दिली आहे. हा अदानी आहे कोण की ज्याचे नाव येताच सर्वजण बिथरतात आणि त्याला वाचवायला धावतात?
हा देश तुमचा आहे. ही लढाई तुमची आहे. आज लाखो तरुण बेरोजगार आहेत. अर्थव्यवस्था तेजीत पुढे जात आहे असे सांगतात तर हे बेरोजगार, महागाई का आहे? मग सरकार काय कामाचे? लोकांना घाबरवण्यासाठी आहे की अदानीला वाचवण्यासाठी आहे. तुमचे ध्यान भरकटवण्याचा सरकार प्रयत्न करते आहे,’ असे आवाहन त्यांनी जनतेला केले.
राहुल गांधींनी विदेशात जाऊन देशाचा अपमान केला, एका वर्गाचा अपमान केला असा आरोप करतात. जो माणूस कन्याकुमारी ते काश्मीर एकतेचा, समतेचा संदेश घेऊन चालला तो देशाचा अपमान करू शकतो? तो तुमच्यासाठी आवाज उठवतो आहे. जनतेच्या हक्कासाठी लढतो आहे. त्यामुळे ही एका राहुलची बाब नाही, ही संपूर्ण देशाची बाब आहे. खोटे पसरवण्याचे काम हे सरकार करत आहे. जगातल्या दोन टॉप संस्थांमधून राहुल गांधी शिकून आले आहेत, पण तुम्ही त्यांना पप्पू म्हणून हिणवले. पण नंतर हाच पप्पू देशभर चालला. मग कळले की हा तर पप्पू नाही. याच्या मागे लाखो लोक चालत आहेत. हा लोकांचे म्हणणे ऐकत आहे. हा इमानदारही आहे. नंतर याने संसदेत ते प्रश्न विचारले ज्यांची यांना उत्तरे द्यायची नाहीत. ज्या माणसाने सुरतमध्ये राहुल यांच्या विरोधात तक्रार केली, त्यानेच गेल्या वर्षी या केसवर स्टे आणला आणि एक वर्षाने त्या वेळी केस ओपन करायला गेला जेव्हा राहुल यांनी संसदेत अदानीविरोधात प्रश्न विचारले. त्यानंतर एक महिन्यात लगेच न्यायाधीशांनी शिक्षाही सुनावली. देशातल्या अनेक न्यायालयांमध्ये अनेक केसेस वर्षोनुवर्षे प्रलंबित असतात. पण या केसचा निकाल पटकन लावला, असेही त्या आपल्या भाषणात म्हणाल्या.
या देशाचे पंतप्रधान भित्रे आहेत. लावा माझ्यावरही केस, तुरुंगात टाका मलाही. पण हेच सत्य आहे. पंतप्रधान आपल्या सत्तेमागे लपले आहेत. अहंकारी आहेत. या देशाची, हिंदू धर्माची परंपरा आहे की, अहंकारी राजाला जनता उत्तर देते. माझ्या कुटुंबाने मला शिकवलेय की, हा देश मनाचे ऐकतो. हा देश सत्याचे ऐकतो. आजपासून हा बदल होईल, असा विश्वास प्रियांका यांनी शेवटी व्यक्त केला. दरम्यान, उद्यापासून काँग्रेसचे देशभर आंदोलन सुरू होत आहे.

Scroll to Top