मुंबई
प्रो कबड्डी लीगच्या १० व्या पर्वासाठी खेळाडूंच्या लिलावाबाबतच्या सुधारित तारखा संयोजकांनी शुक्रवारी जाहीर केल्या. याआधी ८ आणि ९ सप्टेंबर रोजी हा लिलाव होणार होता, मात्र आता ही प्रक्रिया ९ आणि १० ऑक्टोबर रोजी मुंबईत होणार आहे. भारताचा कबड्डी संघ सध्या आशियाई चषक स्पर्धेच्या तयारीत दंग आहे. त्यामुळे भारतीय हौशी कबड्डी महासंघाने खेळाडूंचा लिलाव पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.
यंदाच्या १० व्या पर्वासाठीच्या लिलिवात ५०० पेक्षा अधिक खेळाडूंवर बोली लागणार आहे. त्यात खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धेतील अंतिम फेरीत पोहोचलेल्या दोन संघांमधील २४ खेळाडूंचाही समावेश आहे. लिलावासाठी प्रत्येक संघाला ५ कोटी रुपये खर्च करण्याची मुभा असेल. भारतातील आणि परदेशातील खेळाडूंची चार गटात विभागणी करण्यात आली असून अ, ब, क आणि ड गटासह अष्टपैलू खेळाडू, बचावपटू, चढाईपटू अशी वर्गवारी करण्यात आली आहे. त्यानुसार, अ गटासाठी १० लाख रुपये, ब गटासाठी २० लाख, क गटासाठी १३ लाख आणि ड गटासाठी ९ लाख अशी आधारभूत किंमत असेल. ‘आशियाई क्रीडा स्पर्धेनंतर लगेचच प्रो कबड्डी लीगच्या १० व्या मोसमासाठी खेळाडूंचा लिलाव होणार आहे. त्यामुळे आशियाई स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना करारबद्ध करण्यासाठी फ्रँचायझींमध्ये चढाओढ असेल,’ असे प्रो कबड्डी लीगचे कमिश्नर अनुपम गोस्वामी यांनी सांगितले.