वॉशिंग्टन-
अमेरिकेतील आर्थिक संकट अधिक गडद होत चालले आहे. यातच, अमेरिकेची आणखी एक मोठी बँक ‘फर्स्ट रिपब्लिक बँक’ बुडाली आहे.यूएस नियामकांनी या बँकेची सर्व मालमत्ता जप्त केली आहे. तसेच जेपी मॉर्गन चेस बँकेने अडचणीत असलेली ही फर्स्ट रिपब्लिक बँक विकत घेतली असून तिच्या सर्व ठेवी आणि मालमत्तेचे अधिग्रहण केले आहे.फेडरल डिपॉझिट इन्शुरन्स कॉर्पने ही माहिती दिली.
एफडीआयसीने सांगितले की,कॅलिफोर्नियाच्या नियामकांनी फर्स्ट रिपब्लिक बॅंक बंद केली असून जेपी मॉर्गन चेस बॅंकेला रिसीव्हर म्हणुन नियुक्त केले आहे. आता फर्स्ट रिपब्लिक बँकेची आठ राज्यातील
सर्व ८४ कार्यालये जेपी मॉर्गन चालविणार आहे. आता फर्स्ट रिपब्लिक बँकेचे सर्व खातेदार जेपी मॉर्गनचे खातेदार बनणार आहेत. त्यांची खाती तशीच पुढे चालू राहणार आहेत.
म्हणजेच फर्स्ट रिपब्लिक बॅंक बुडाली तरी खातेदारांचे पैसे सुरक्षित राहणार आहेत. फर्स्ट रिपब्लिकला मार्चच्या सुरुवातीपासूनच वाईट काळांचा सामना करावा लागला होता. असे मानले जात होते की,बँक स्वतंत्र संस्था म्हणून जास्त काळ टिकू शकणार नाही. तत्पूर्वी, ठेवीदारांनी बँकेतून जास्त पैसे काढल्यामुळे बँक आपल्या ताळेबंदातील गोंधळ स्पष्ट करण्यात अपयशी ठरली होती. आता या बँकेचे नुकसान भरून काढण्यासाठी जेपी मॉर्गन चेस बॅंकेला १३ अब्ज डॉलर्स द्यावे लागणार आहेत.त्यामध्ये फेडरल डिपॉझिट इन्श्युरन्स कॉर्पोरेशन अर्धी भरपाई देणार आहे. १३ एप्रिलपर्यंत
या बँकेची एकूण मालमत्ता २२८.१ अब्ज डॉलर्स आणि एकूण जमा रक्कम १०३.९ अब्ज डॉलर्स इतकी होती. ही बँक ताब्यात घेण्यासाठी जेपी मॉर्गन चेसप्रमाणे सिटीझन फायनान्स ग्रुप, पीएनसी फायनान्शियल सर्व्हिसेस ग्रुप युएस बँककॉर्प आणि बँक ऑफ अमेरिका या बॅंका सुद्धा प्रयत्नशील होत्या.