मनिला –
फिलिपाइन्सची राजधानी मनिलाजवळील तलावात बोट उलटून ३० जणांचा मृत्यू झाला. तर ४० प्रवाशांची सुटका करण्यात आली. ही घटना काल दुपारी एक वाजताच्या सुमारास घडली. फिलिपाइन्स तटरक्षक दलाच्या म्हणण्यानुसार, जोरदार वाऱ्यामुळे बोट हेलकावे खात होती. प्रवासी भयभीत होऊन बोटीच्या एका बाजूला गेले. त्यामुळे बोट एका बाजूला झुकून तिचा आउटरिगर तुटला. त्यानंतर बोट बुडाली.
या बोटीची क्षमता जास्तीत जास्त ४२ प्रवासी आणि चालक दलाचे सदस्य इतकी होती. पण बोटीमध्ये ७० प्रवासी होते त्यामुळे ती ओव्हरलोड झाली होती. शिवाय सुरक्षा नियमांनुसार अनेक प्रवाशांनी जीवरक्षक जॅकेट घातली नव्हती. फिलिपाइन्समध्ये बोट ओव्हरलोड झाल्यामुळे बोट बुडाल्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. अनेकदा जुन्या बोटींमुळेही अपघात घडतात.