मुंबई- राज्यात गुंडगिरी वाढली आहे, धार्मिक तेढ वाढली आहे. फोडा आणि झोडा अशी निती सत्ताधाऱ्यांनी राबवायला सुरुवात केली आहे असा आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत केले.
विरोधी पक्षाच्या वतीने उपस्थित करण्यात आलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावाची सुरूवात करताना ते बोलत होते. राज्यात धमक्यांचे सत्र सुरू आहे त्यातून खुद्द मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी , खा शरद पवार यांनाही सुटका मिळालेली नाही, त्यात सर्वसामान्यांचं काय असा सवाल त्यांनी केला.
विरोधी पक्षाच्या आजी , माजी आमदाराना ACB च्या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत, आमदारांवर हल्ले होत आहेत, हसन मुश्रीफ यांच्यावर ई डी च्या धाडी पडताहेत ,
विरोधकांकडे बोट दाखवून राजकारण करण्याची पद्धत सुरू झाली आहे अशी टीका त्यांनी यावेळी केली.
अनिल जयसिंघानी या फरार बुकीची मुलगी आपल्या घरात थेट कशी येऊ शकते याचं उत्तर गृहमंत्र्यांनी द्यायला हवं अशी मागणी पवारांनी केली. पोलिस दलात बदल्या आणि बढत्या यावरून प्रचंड अस्वस्थता आहे, सुधारित आकृतीबंध रखडला आहे त्याला मान्यता कधी मिळेल असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
सध्या ऑनलाईन गेम चे पेव फुटलं आहे , तरुण पिढी यातून वाईट मार्गाला जाते आहे , त्यावर तातडीने बंदी घाला आणि त्याचा प्रचार करणाऱ्या अभिनेत्यांवर गुन्हे दखल करा अशी मागणी अजित पवार यांनी केली.