जळगाव – जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील चोरवड येथील एका राष्ट्रीयीकृत बँकेच्या शाखेतील सीडीएम मशिनमध्ये खातेदाराने भरलेल्या पाचशेच्या सहा नोटा बनावट निघाल्याने खळबळ उडाली. याप्रकरणी पारोळा पोलिसांत एका खातेदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पारोळा येथील एचडीएफसी बँक शाखेचे व्यवस्थापक जितेंद्र किशोर खरे यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. २९ मे रोजी सायंकाळच्या सुमारास तालुक्यातील चोरवड पारोळा येथील राजू आत्माराम पाटील हे बँकेच्या कॅश डिपॉझिट मशिनद्वारे आपल्या खात्यात भरणा करण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी पाचशे रुपयांच्या सहा नोटा सीडीएम मशिनमध्ये भरल्या. परंतु या नोटा खोट्या व बनावट असल्याने त्या खात्यात न जमा होता सीडीएमच्या कॅसेटमध्ये जमा झाल्या. दरम्यान, बँकेचे कॅशिअर तुषार जोशी व रमेश सपकाळे यांनी तपशील तपासला असता या नोटा बनावट आढळून आल्या. नोटा जमा करणाऱ्या खातेदाराचा खाते क्रमांक तपासला असता तो चोरवड येथील राजू आत्माराम पाटील यांचा निघाल्याने त्यांना बँकेत बोलावून हा प्रकार सांगितला. दरम्यान, पाटील यांनी पैसे भरल्याचे कबूल केले असून, बनावट नोटा आढळल्याप्रकरणी पारोळा पोलिसात राजू पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.