ठाणे – धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावरील बॉक्स ऑफिसवर गाजलेल्या ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ या मराठी चित्रपटाच्या जाहिराती ठाणे महानगरपालिका परिवहनच्या (टीएमटी) बसवर गेल्या वर्षभरापासून मोफत झळकत आहेत. अशा एकूण २० बस आहेत. या जाहिरातीच्या माध्यमातून ठाणे परिवहनला कोणतेही उत्पन्न न मिळाल्याने प्रशासनाचे लाखोंचे नुकसान झाले आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन वर्ष उलटूनही ही पोस्टर बसवरून हटवलेली नाहीत . ही माहिती आरटीआय कार्यकर्ते कमलाकर शेणाॅय यांनी ही माहिती मिळवली आहे .
ठाणे परिवहन प्रशासनाचे चाक नेहमीच आर्थिक गाळात रुतलेले असते. प्रवाशांच्या सेवेत कमी व आगारात दुरुस्तीसाठी जास्त अशी टीएमटी बसची अवस्था असते. गेल्या आठ वर्षांपासून परिवहन प्रशासनाने उत्पन्न वाढीसाठी तब्बल तीन वेळा बसेसवरील जाहिरातीसाठी निविदा काढल्या आहेत. या निविदा प्रक्रियेला कोणताही प्रतिसाद ठेकेदारांकडून दिला जात नसल्याने या बस विनाजाहिरात शहरात फिरतात, मात्र गेल्या वर्षी १३ मे रोजी शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित ‘धर्मवीर’ चित्रपट महाराष्ट्रभर प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या जाहिरातींचे पोस्टर टीएमटी बसेसवर चिकटवण्यात आले. मात्र त्याचे भाडे मिळालेले नाही .
मागील वर्षभरात ठाणे परिवहन प्रशासन महसूल मिळवण्यात अपयशी ठरल्याचे टीएमटीचे अध्यक्ष विलास जोशी सांगितले. टीएमटीचे व्यवस्थापक भालचंद्र बेहरे म्हणाले, ‘या आठवड्याभरात पोस्टर काढले जातील. यासंदर्भात आम्ही अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत.’ दरम्यान, या जाहिराती ठेकेदार नसतानाही वर्षभर परवानगीशिवाय कशा ठेवण्यात आल्या, निविदा प्रक्रिया न करताच बसवर जाहिराती कशा लावल्या या प्रश्नांना उत्तर देणे बेहरे यांनी टाळले. याबाबत चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई म्हणाले, ‘मी चित्रपटाच्या प्रदर्शनात व्यस्त असल्याने मला पोस्टर मोहिमेबद्दल काहीच माहिती नाही.’