छत्रपती संभाजीनगर:- छत्रपती संभाजीनगर शहरातील प्रसिद्ध सराफा दुकानावर जीएसटीच्या वसुली पथकाने छापा घातला आहे. शुक्रवारी दुपारी सुरु झालेली छापेमाराला सुरुवात झाली होती. सदर कारवाई ही शनिवारी दुपार पर्यंत सुरुच होती.रतनलाल सी बाफना ज्वेलर्स असे या दुकानाचे नाव आहे. या छापेमारीनंतर संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.
आर्थिक वर्षातील मार्च हा अखेरचा महिना असल्याने करवसुली यंत्रणा सक्रिय झाल्याचे दिसत आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील बाफना ज्वेलर्स जीएसटीच्या वसुली पथकाने छापा घातला आहे. शुक्रवारी सुमारे 10 तास अधिकाऱ्यांनी दुकानातील व्यवहारांविषयी चौकशी केली. त्यानंतर शनिवारी देखील कारवाई सुरूच असून, या काळात सर्व कर्मचारी आणि व्यवस्थापकांना दुकानातच थांबवण्यात आले. शुक्रवारी दुपारनंतर दुकानाचे मालक शहरात पोहोचल्यावर पुढील चौकशी सुरु झाली होती.
कर चोरीप्रकरणी जीएसटीच्या वसुली पथकाने ही छापेमारी केली आहे. कारवाईसाठी आलेल्या पथकाने सुरुवातीला दुकानातील सर्व फोन बंद केलेे आणि चौकशी सुरु केली. तसेच या पथकाने दुकानातील ज्वेलरी खरेदी-विक्री संबधित कागदपत्रे तपासली आहे. वेगवेगळ्या बिलांची तपासणी सुरु असून भरलेल्या जीएसटीबाबत चौकशी केली जात आहे. तर संबधित ज्वेलर्सने कर चोरल्याचा जीएसटी पथकाला संशय आहे. त्यानुसार चौकशी सुरु आहे. या कारवाईबाबत जीएसटी विभागाकडून अजूनही कोणतेही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.