वॉशिंग्टन – जगातील सर्वात शक्तिशाली देश अशी ओळख असणारा अमेरिका सध्या कर्जात बुडाला आहे. देश आर्थिक संकटात सापडल्याने अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी आपला जी-7 आशिया दौरा रद्द केला आहे. ते ऑस्ट्रेलिया आणि पापुआ न्यू गिनीला जाणार नाहीत, मात्र जपानमध्ये होणार्या जी-7 च्या शिखर संमेलनाला हजेरी लावतील. बायडन येणार नसल्याने ऑस्ट्रेलियानेही सिडनीत होणारी क्वॉड बैठक रद्द केली आहे.
अमेरिकेचे राजकोषीय भांडार संपण्याच्या बेतात आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने तीन महिन्यांपूर्वीच याचा इशारा दिला होता. अमेरिकन सरकारने आपली कर्ज घेण्याची मर्यादा पार केली आहे, असा इशारा नाणेनिधीने दिला होता. नाणेनिधीनुसार जर अमेरिका आर्थिक दिवाळखोरीत गेली तर संपूर्ण जगात आर्थिक
अस्थिरता येईल.
जो बायडन सध्या अमेरिकेतील कर्जामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटाचे प्रश्न सोडवण्यात गुंतले आहेत. अशा स्थितीत त्यांनी पुढील आठवड्यात होणारा विदेश दौरा स्थगित केला आहे. व्हाईट हाऊसने एक निवेदन जारी करून अध्यक्ष बायडन यांनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अल्बानीज यांच्याशी याबाबत चर्चा केली असल्याचे म्हटले आहे. 24 मे रोजी ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे क्वाड बैठक होणार होती. जो बायडन या बैठकीला उपस्थित राहू न शकल्याने ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी पुढील आठवड्यात ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे होणारी क्वाड बैठक तूर्तास पुढे ढकलण्यात आली असल्याचे बुधवारी जाहीर केले आहे. अल्बानीज यांनी यापूर्वी सांगितले होते की, भारत, जपान आणि ऑस्ट्रेलिया हे देश अमेरिकेच्या उपस्थितीशिवायही बैठकीसाठी येऊ शकतात. बायडन यांनी भेट रद्द केल्यानंतर त्यांचे सरकार जपान आणि भारताच्या पंतप्रधानांशी बोलत असल्याचे त्यांनी सांगितले होते. तथापि, नंतर अध्यक्ष अल्बानीज यांनी याबाबत दिलगिरी व्यक्त करत सांगितले की, त्यांना क्वाड बैठकीचा निर्णय पुढे ढकलावा लागत आहे. त्यामुळे आता भारत आणि जपानच्या पंतप्रधानांकडूनही याला सहमती दर्शवली आहे. असे असले तरी देखील जर भारताकडून निर्णय घेण्यात आला तर पुढील आठवड्यात ऑस्ट्रेलियात पंतप्रधान मोदींसोबत त्यांची द्विपक्षीय बैठक अजूनही होऊ शकते. असे देखील अल्बानीज यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान,जपानच्या अध्यक्षतेखाली होणार्या जी-7 शिखर परिषदेसाठी पंतप्रधान मोदी 19 ते 21 मे दरम्यान हिरोशिमा, जपानला भेट देणार आहेत. जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्या निमंत्रणावरून ते जपानला भेट देत आहेत. शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान जी-7 सत्रांना संबोधित करतील. त्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन यांच्यासह अन्य काही नेत्यांचाही समावेश असेल.
बायडनचा ऑस्ट्रेलिया दौरा दिवाळखोरीच्या संकटामुळे रद्द
