मुंबई – रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात कशेळीमधील कातळशिल्पाला ‘राज्य संरक्षित स्मारक’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. दुसरीकडे तेल शुद्धीकरण प्रकल्प असलेल्या बारसूमधील कातळशिल्पांना मात्र संरक्षित स्मारकाच्या यादीतून वगळण्यात आले आहे.
बारसू गावच्या सडय़ावर अनेक कातळशिल्पे आहेत. मात्र येथे तेलशुद्धीकरण प्रकल्प प्रस्तावित आहे. संरक्षित स्मारक झाल्यास बांधकाम, खाणकाम करता येणार नाही. संरक्षक कठडे बांधावे लागेल व देखरेखीची जबाबदारी राज्य पुरातत्व विभागाकडे जाईल. बारसू तेल शुद्धीकरण प्रकल्पाचा विकास ‘एमआयडीसी’ करत आहे. भूसंपादनात कातळशिल्पे वगळण्यात येणार असून त्यांचे जतन सीएसआर फंडातून करण्यात येणार असल्याचे समजते. त्यामुळेच पुरातत्व खात्याने प्रस्ताव पाठवूनही बारसूच्या कातळशिल्पांचे नाव मंत्रालय स्तरावर वगळण्यात आली आहेत.
दुसरीकडे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १७० गावांमध्ये १७०० पेक्षा अधिक कातळशिल्पांचा शोध रत्नागिरीच्या ‘निसर्गयात्री’ संस्थेने लावला आहे. या कातळशिल्पांना संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार २०१८ साली रत्नागिरी जिल्हा पुरातत्व कार्यालयाने १८ कातळशिल्पांचे प्रस्ताव राज्य पुरातत्व विभागाला पाठवले होते. त्यातील १० कातळशिल्पांना संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. यापैकी कशेळीच्या कातळशिल्पाला संरक्षित स्मारकाचा मान सर्वप्रथम मिळाला आहे. अन्य ८ कातळशिल्पांबाबत अधिसूचना काढण्यात आल्या असून त्यावरील हरकती तपासल्यानंतर त्यांनाही लवकरच हा दर्जा मिळू शकेल.