रत्नागिरी- प्रस्तावित बारसू रिफायनरी प्रकल्पाचा सर्व्हे कडक पोलीस बंदोबस्तात आजपासून सुरू होणार होता. मात्र हा सर्व्हे आज झालाच नाही. या सर्व्हेला विरोध करण्यासाठी बारसू, सोलगाव, गोवळ येथील ग्रामस्थांनी बारसूच्या सड्यावर एकत्र येऊन ठिय्या मांडला. रिफायनरी रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही येथून हटणार नाही, असा निर्धार ग्रामस्थांनी केला. या आंदोलनावरून राज्यातील राजकारण तापणार असून, याबाबत उद्या माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेणार आहेत.
रिफायनरी प्रकल्प नाणारमध्ये होणार होता. याला ग्रामस्थांचा तीव्र विरोध झाला. त्यानंतर महाविकास आघाडीने हा प्रकल्प तेथून हलविण्याचा निर्णय घेत तो बारसू, सोलगावमध्ये करण्याचा निर्णय घेतला होता. आतापर्यंत या ग्रामस्थांनी तीन वेळा बारसू रिफायनरीचा सर्व्हे बंद पाडला आहे. 24 एप्रिलपासून बारसू रिफायनरी प्रकल्पाचे सर्वेक्षण पुन्हा सुरू होण्याची माहिती मिळताच गेल्या काही दिवसांपासून बारसू आणि सोलगावासह आजूबाजूच्या स्थानिक ग्रामस्थांनी मोठे आंदोलन उभारण्याची तयारी सुरू केली होती. त्यांचा विरोध मोडून काढण्यासाठी पोलिसांनी रात्रीपासूनच बारसूसह आजुबाजूच्या परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली होती. पोलिसांनी काही ग्रामस्थांना नोटिशी देखील पाठवल्या होत्या. हे सर्व झुगारून आज सकाळी आंदोलक ग्रामस्थ भरउन्हात बारसूच्या सड्यावर एकत्र जमले. महिला ग्रामस्थांनी जीवनावश्यक वस्तू सोबत घेऊन सड्यावर मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. ‘जमीन आमच्या हक्काची, नाही कोणाच्या बापाची,’ अशा घोषणा संतप्त ग्रामस्थांनी दिल्या. ‘आम्हाला हा रिफायनरी प्रकल्प नको. जोपर्यंत रिफायनरी रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही येथून हटणार नाही,’असे ठणकावत ग्रामस्थांनी ठिय्या दिला होता.
या आंदोलनादरम्यान काही आंदोलक महिलांना दुपारी उष्माघाताचा त्रासही जाणवला. एका महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले. रिफायनरीचे सर्व्हेक्षण करण्याचे आज नियोजित होते. मात्र तेथे सर्व्हेक्षण करण्यासाठी कोणताही अधिकारी फिरकलाच नाही. त्यामुळे आज सर्व्हेक्षण झालेच नाही. असे असले तरी ग्रामस्थांनी आपले ठिय्या आंदोलन कायम ठेवत सरकारविरोधात जोरदार घोषणा दिल्या. सिंधुदुर्ग येथे माध्यमांशी बोलताना खासदार विनायक राऊत म्हणाले की, रिफायनरीचा ध्यास घेतलेल्या या राज्यकर्त्यांनी पोलिसी यंत्रणेचा दुरूपयोग करत लोकांची डोकी फुटली तरी चालतील, पण रिफायनरीचा प्रकल्प पुढे रेटायचा अशा पद्धतीने कामाला सुरुवात केली आहे. उद्धव ठाकरे यांनी याची गंभीररित्या दखल घेतली आहे. ते उद्याच पत्रकार परिषद घेऊन या पोलिसी अतिरेकीपणाच्या विरोधात आपली भूमिका मांडणार आहेत आणि जर गरज पडली तर आम्ही राज्यपालांची भेट
घेणार आहोत.
पोलिसांच्या गाडीला अपघात
रिफायनरी सर्वेक्षण बंदोबस्तासाठी निघालेल्या पोलिसांच्या गाडीला कशेडी गावाजवळ अपघात झाला. त्यात 17 पोलीस जखमी झाले. त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
बारसू रिफायनरीचा वाद ग्रामस्थ विरोधात एकवटले
