मुंबई – बिपरजॉय चक्रीवादळ अरबी समुद्रात १००० ते ११०० किमीवर असून उत्तरेच्या दिशेने सरकत आहे. त्यामुळे मुंबई, कोकण आणि केरळला या चक्रीवादळाचा धोका कमी आहे. मात्र, चक्रीवादळाभोवती फिरणाऱ्या वेगवान वाऱ्यांचा प्रभाव किनारपट्टीला जाणवू शकतो. दरम्यान, चक्रीवादळ पुढे सरकल्याने केरळमध्ये मान्सून दाखल होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
पुढील तीन दिवस कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्र किनारपट्टीवर ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या काळात मच्छीमारांनी खोल समुद्रात जाणे धोकादायक असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. सध्या चक्रीवादळ पश्चिम किनारपट्टीपासून खोल समुद्रात सुमारे १ हजार किलोमीटर नैऋत्येला असून, ताशी चार किलोमीटर वेगाने त्याचा उत्तरेकडे प्रवास सुरू आहे. त्यामुळे पश्चिमेकडील वाऱ्यांच्या उंचीमध्ये वाढ होत असून अरबी समुद्र, लक्षद्वीप, केरळ किनार्यावरील ढगाळ वातावरणात आहे. दरम्यान, पुढील ४८ तासांत केरळमध्ये मान्सून सुरू होण्यासाठी परिस्थिती अनुकूल असल्याचे हवामान विभागाचा अंदाज आहे.