हैदराबाद – तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्या उपिस्थतीत महाराष्ट्रातील बीआरएसच्या प्रमुख नेत्यांची हैदराबाद येथे बैठक आज पार पडली. यावेळी महाराष्ट्रातील सर्व २८८ विधानसभेच्या जागा लढवण्यावर चर्चा झाली.
महाराष्ट्रातील प्रत्येक मतदारसंघात बीआरएसचे तेलंगणातील काम पोहोचवण्यासाठी प्रचार मोहीम हाती घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी प्रत्येक मतदारसंघासाठी पाच जणांची कोअर कमिटीदेखील तयार करण्यात आली आहे. के.चंद्रशेखर राव यांनी घेतलेल्या या बैठकीत महाराष्ट्रातील अनेक माजी खासदार,माजी आमदार विविध पक्षाच्या राजकीय पदावरील मोठे नेते, शेतकरी संघटनेचे मोठे नेते उपस्थित होते.
तेलंगणा भवन येथे पार पडलेल्या या बैठकीत महाराष्ट्रातील सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये भारत राष्ट्र समितीचे प्रचार वाहन प्रत्येक गावात फिरवण्याचे ठरले. तसेच भारत राष्ट्र समितीची किसान आघाडी, महिला, एससी, एसटी, अल्पसंख्यांक, कामगार, युवक, विद्यार्थी, ओबीसी अशा विविध आघाड्या व त्यांच्या समित्या गठीत करण्यात येणार आहेत.