बीड –
बीडमधील भगवान पुरुषोत्तमाच्या मंदिराचा जीर्णोद्धार करताना महादेवाच्या पिंडीखालून एक तोळ्याचे सोन्याचे कासव सापडले. हे कासव पाहण्यासाठी मंदिर परिसरात नागरिकांनी एकच गर्दी केली. त्यानंतर या कासवाची पूजादेखील केली.
७०० वर्षांपूर्वी राजा रामदेवराय यांनी उभारलेले भगवान पुरुषोत्तमाचे एकमेव मंदिर माजलगाव तालुक्यातील पुरुपोत्तमपुरी गावात गोदावरी नदीच्या काठी आहे. या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सध्या सुरू आहे. पुरुषोत्तमाच्या मूर्तीसमोरील महादेवाची पिंड हलवताना पिंडीखाली एक तोळा वजनाचे सोन्याचे कासव सापडले. त्यानंतर नागरिकांनी या कासवाची पूजा केली. नवीन मंदिर उभारणीनंतर पुन्हा त्याच पिंडीखाली कासव ठेवले जाणार आहे.
अधिक महिन्यात या गावात एक महिनाभर यात्रा असते. तेव्हा भारतातून लाखो भाविक दर्शनासाठी येतात. या मंदिराची होणारी पडझड पाहता शासनाकडून मंदिराच्या जीर्णोद्धारासह विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या प्रयत्नातून ५४ कोटी रुपयांचा निधी शासनाकडून मंजूर झाला आहे.