औगाडौगौ –
उत्तर बुर्किना फासोमधील एसॅकेन गावात काल प्रार्थनेदरम्यान दरम्यान कॅथोलिक चर्चवर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात १५ नागरिकांचा मृत्यू झाला असून २ जण जखमी झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मृत्यू झालेले सर्व नागरिक कॅथोलिक धर्माचे असल्याचे सांगितले जात आहे. या हल्ल्याबाबत चर्चच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, काल चर्चमध्ये प्रार्थनेसाठी लोक जमली असताना हा हल्ला झाला. या हल्ल्यात किमान १५ कॅथोलिकधर्मीय नागरिकांचा मृत्यू झाला असून २ जण जखमी झाले. या हल्ल्याबाबत डोरीच्या कॅथोलिक डायोसीसचे व्हिकर-जनरल ॲबोट जीन-पियरे सवाडोगो यांनी एक निवेदन जारी केले. त्यामध्ये असे म्हटले आहे की, ‘हल्ल्यात १२ नागरिकांचा घटनास्थळी मृत्यू झाला. तर ३ नागरिकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. २ नागरिकांवर अद्याप उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर आहे.’
दरम्यान या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही गटाने स्वीकारलेली नाही. मात्र, हा हल्ला जिहादींनी केला असावा असा संशय अनेकांनी व्यक्त केला आहे. यापूर्वी ही जिहादींनी अनेकदा दुर्गम समुदाय आणि सुरक्षा दलांवर हल्ले केले आहेत.