बुलढाणा- बुलढाण्यात आफ्रिकन स्वाईन फ्लूमुळे हजारो डुकरांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाल्यावर शहरातील डुकरांचा नायनाट करण्याचे आदेश प्रभारी जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी प्रशासनास दिले आहेत. दरम्यान, मानवी आरोग्याला याचा कोणताही धोका नाही, असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले आहेत.
गेल्या महिन्याभरापासून बुलढाणा शहरातील डुक्कर अचानक मृत्यमुखी पडत आहेत. याबाबत संशय आल्याने पालिकेने मृत डुकरांच्या अवयवाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले होते. त्यातून सर्व डुकरांचा मृत्यू ऑफ्रिकन स्वाईन फ्लू या रोगामुळे झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली. त्यानंतर आता हा संसर्ग रोखण्यासाठी शहरातील सर्व डुकरांचा नायनाट करण्याचे आदेश प्रभारी जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी दिले आहेत. त्यानुसार पालिकेने आता या सर्व डुकरांचा नायनाट करण्यासाठी दहा जणांचे पथक तयार केले आहे. शहरातील डुकरांचा नायनाट करण्याची प्रक्रिया सुरूदेखील करण्यात आली आहे. आफ्रिकन स्वाईन फ्लू पासून मानवी आरोग्याला कुठलाही धोका नसून नागरिकांनी घाबरण्याची गरज नाही, असे आवाहनदेखील नगरपालिकेचे मुख्याधिकारी गणेश पांडे यांनी केले आहे.