बुलढाणा – पावसाच्या भाकितासाठी ग्रामीण भागात प्रसिद्ध असलेली बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळ येथील घट मांडणी शनिवारी करण्यात आली. या घटमांडणीचे अंदाज रविवारी जाहीर होणार आहेत.
शेतकऱ्यांपासून सर्वसामान्य व्यक्तींपर्यंत सगळे या घट मांडणीच्या अंदाजाकडे लक्ष लावून असतात. ३५० वर्षांपूर्वी या भागातील तपस्वी चंद्रभान महाराज यांनी सुरू केलेली ही प्रथा आजही सुरू आहे. आजच्या काळात तपस्वी चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज हे निसर्गातील घडामोडींचं निरीक्षण करून अंदाज जाहीर करत असतात. दरवर्षी अक्षय्य तृतीयेला ही घटमांडणी होते, या अंदाजाबद्दल शेतकऱ्यांमध्ये मोठी उत्सुकता असते.
शेतात खड्डा, खड्ड्यात मातीचा घट, घटात पाणी आणि त्यावर कुरडया, त्याच्या बाजूला पान सुपारी आणि विविध १८ प्रकारची धान्ये, अशा प्रकारे ‘घट मांडणी’ रेली जाते. वर्षभराचा हंगाम, पीक, पाऊस अर्थव्यवस्था, संरक्षण व्यवस्था आणि राजकीय घडामोडींचे अंदाज वर्तवले जातात. या प्रथेला वैज्ञानिक आधार नसला तरी मात्र, शेतकरी यावर विश्वास ठेवतात. त्यानुसार वर्षभराचे शेतीविषयक नियोजन करतात.