मुंबई – देशातील उत्तम दर्जाच्या कापडाची निर्मिती करणाऱ्या वाडिया उद्योग समुहाच्या बॉम्बे डाइंग अँड मॅन्युफॅक्चरिंग या कंपनीने वरळीमध्ये असलेल्या २२ एकर जमिनीची विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. हा विक्रीचा व्यवहार ५२०० कोटी रुपयांना ठरला आहे.कंपनीच्या संचालक मंडळाच्या काल बुधवारी झालेल्या बैठकीत या व्यवहाराला मंजुरी देण्यात आली.या जमिनीसोबत असलेल्या एफएसआयचीही विक्री होणार आहे.हा जमीन व्यवहार दोन टप्प्यांमध्ये होईल.
मुंबईच्या इतिहासातील सर्वांत मोठा हा जमीन विक्री व्यवहार असल्याचे सांगितले जात आहे.जपानमधील सुमितोमो रिअल्टी अँड डेव्हलपमेंट कंपनीची उपकंपनी असलेली गोईसू रिअल्टी प्रा.लि.ही कंपनी बॉम्बे डाइंगची जमीन विकत घेणार आहे.या व्यवहाराच्या पहिल्या टप्प्यात ४ ६७५ कोटी रुपयांचा व्यवहार होईल,तर उरलेले ५२५ कोटी रुपये बॉम्बे डाइंगला दुसऱ्या टप्प्यात मिळतील, ही माहिती कंपनीचे अध्यक्ष नसली वाडिया यांनी दिली. या जमीन विक्रीमुळे शेअर बाजारात या कंपनीचा भाव सुमारे ७ टक्क्यांनी १४० रुपयांच्या पुढे गेला होता.
दरम्यान,कंपनीकडील वापर न झालेल्या जमिनीचा विक्री करण्याचा तत्त्वतः निर्णय घेण्यात आलेला असून याद्वारे निवासी आणि व्यापारी संकुलांसाठी ३५ लाख चौरस फूट जागा विकसित करून त्यातून पुढे येत्या काही वर्षांत पंधरा हजार कोटी रुपयांचा महसूल मिळू शकेल, असा विश्वासही कंपनीने व्यक्त केला आहे.सुमितोमो कॉर्पोरेशन हा जपानमधील सर्वात मोठ्या आणि वैविध्यपूर्ण व्यवसाय समूहांपैकी एक आहे.१९६० पासून तो भारतात कार्यरत आहे.