अयोध्या – भारतीय कुस्ती महासंघाचे (डब्लूएफआय) अध्यक्ष आणि भाजपा खासदार ब्रजभूषण शरण सिंह ५ जून रोजी अयोध्येत शक्तीप्रदर्शन करणार आहेत. अयोध्येतील रामकथा पार्कमध्ये त्यांनी जनचेतना यात्रा आयोजित केली आहे. या यात्रेत अयोध्या, प्रयागराज आणि हरिद्वार येथील सर्व संत सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमात ब्रजभूषण साधु-संतांकडे पाठिंबा मागतील, असे म्हटले जाते.
या यात्रेसाठी ब्रजभूषण यांनी भाजपामधल्या एकाही नेत्याला बोलावलेले नाही. मात्र देशभरातील साधू- संतांना निमंत्रण दिले आहे. या यात्रेत लाखो लोकही सहभागी होतील, असे ब्रजभूषण यांनी म्हटले आहे.
ब्रजभूषण यांच्यावर महिला कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचा गंभीर आरोप करत आंदोलन केले आहे. त्यांच्यावर एफआयआरही दाखल करण्यात आला. याप्रकरणी ब्रजभूषण यांना अटक करावी, अशी कुस्तीपटूंची मागणी आहे. ब्रजभूषण यांची पक्षातून हकालपट्टी व्हावी, अशीही मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाला स्वतःची ताकद दाखवून देण्यासाठी त्यांनी ही यात्रा आयोजित करण्यात आली आहे.