- इन्फोसिसचे शेअर्स गडगडले !
लंडन –
‘इन्फोसिस’चे शेअर्स गडगडल्याचा फटका ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पत्नी अक्षता मूर्ती यांनाही बसला आहे. मूर्ती यांचे एकाच दिवसात सुमारे ६१ दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे ५०० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. सोमवारी ‘इन्फोसिस’चे शेअर्स १० टक्क्यांनी घसरले होते. यामुळे अक्षतांचेही मोठे नुकसान झाले.
ऑक्टोबर २०१९ नंतर ‘इन्फोसिस’च्या शेअर्समधील ही सर्वाधिक घसरण आहे. अक्षता या ‘इन्फोसिस’च्या सह-संस्थापक नारायण मूर्तींच्या कन्या आहेत. काही दिवसांपूर्वीच सुनक यांना अक्षता यांच्या कराशी संबंधित प्रकरणावर संसदेत उत्तर द्यावे लागले होते. यावर्षीच्या पहिल्या तिमाहीत ‘इन्फोसिस’ला नफ्याची अपेक्षा होती.-मात्र बाजारातील बदललेल्या कलामुळे कंपनीला तोटा झाला. यामुळेच अक्षतांना ५०० कोटींपेक्षा जास्त नुकसान झाले.
अक्षता यांच्याकडे ‘इन्फोसिस’चा ०.९४ टक्के वाटा आहे. त्यांच्याकडे कंपनीचे सुमारे ३.८९ कोटी शेअर्स आहेत. सुनक कुटुंबासाठी हे मोठे नुकसान मानले जात आहे. यानंतरही त्यांच्याकडे सुमारे ४६०० कोटींची संपत्ती आहे. सामान्य नागरिक महागाईने हैराण झालेले असताना सुनक कुटुंबीय कोट्यवधी रुपये कसे कमावत आहेत, याची चर्चा सध्या ब्रिटनमध्ये आहे. ब्रिटनच्या पंतप्रधानांच्या संपत्तीची ही आकडेवारी काही दिवसांपूर्वी ब्लूमबर्गने प्रसिध्द केली होती.