ब्रिटनच्या पंतप्रधानांचा आठवड्याचा
विमानप्रवास खर्च तब्बल ४.५ कोटी

लंडन- ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक हे त्यांच्या ऐशोरामी जीवनशैलीमुळे चर्चेत आले आहेत. एका अहवालानुसार, पंतप्रधान सुनक यांनी गेल्या वर्षी केवळ एका आठवड्यात खासगी जेटने प्रवास करण्यासाठी ५ लाख पौंड म्हणजेच ४.५ कोटी रुपये खर्च केले आहेत. याबाबत
विरोधी लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाने सुनक हे जनतेच्या करातून मिळालेल्या पैशाची उधळपट्टी करत असल्याची टीका केली आहे.

द गार्डियनमधील वृत्तानुसार, पंतप्रधान ऋषी सुनक यांनी इजिप्तमधील केवळ एक दिवसाच्या कॉप – २७ परिषद भेटीसाठी खासगी जेट प्रवासासाठी ९६ लाखांहून अधिक खर्च केला आहे. सुनक यांनी ६ नोव्हेंबरला उड्डाण केले आणि दुसऱ्या दिवशी ते ब्रिटनला परतले. या भेटीनंतर सुनक जी-२० परिषदेत सहभागी होण्यासाठी इंडोनेशियाला पोहोचले.या प्रवासासाठी सुनक यांनी ३ कोटी ३७ लाखांहून अधिक खर्च केला. यासोबतच पंतप्रधान सुनक यांनी डिसेंबरमध्ये लाटविया आणि एस्टोनियाच्या दौऱ्यात ५५ लाख रुपयांहून अधिक खर्च केला होता.

यासंदर्भात उदारमतवादी लिबरल डेमोक्रॅटने खराब अर्थव्यवस्थेशी झुंजत असलेल्या ब्रिटनसाठी ऋषी सुनक यांना लक्ष्य केले आहे. डेमोक्रॅट्सनी ट्विट केले आहे, की लोक त्यांची बिले भरण्यास सक्षम नाहीत. जनता आर्थिक संकटाचा सामना करत आहे. लोकांना खाण्यापिण्याची चिंता आहे. अशा स्थितीत देशाचे पंतप्रधान जनतेच्या कराचा पैसा हवेत उडवत आहेत. खरे तर हे पुराणमतवादी सरकार पूर्णपणे नियंत्रणाबाहेर आहे.

Scroll to Top