ब्रिटनमध्ये ’द केरला स्टोरी’ शो मुस्लीम तरुणाचा धुडगूस

लंडन – ब्रिटनमधील बर्मिंगहॅम शहरातील मल्टिप्लेक्समध्ये एका मुस्लीम तरुणाने ‘द केरला स्टोरी’ सिनेमा सुरू असताना धुडगूस घातला. हा सिनेमा भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मुस्लिमविरोधी प्रचार असल्याचे म्हणत हा तरुण गोंधळ घालत होता. याचा व्हिडिओ नंतर सोशल मीडियावरही व्हायरल झाला. भाजप आणि हिंदुत्वाच्या अतिरेकी प्रचाराला ब्रिटनमध्ये स्थान नाही,’ असे ट्विट करत या तरुणाने हा व्हिडिओही शेअर केला.
ब्रिटनमध्ये ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाला पूर्व परवानगी न घेतल्याने हा चित्रपट ब्रिटनमध्ये थोडा उशिरा म्हणजे 19 मे रोजी प्रदर्शित करण्यात आला. त्याच्या दुसर्‍याच दिवशी हा प्रकार घडला. शकील अफसर हा मुस्लीम तरुण चित्रपटाचा शो सुरू असताना मध्येच उठून उभा राहिला आणि त्याने चित्रपटाच्या विरोधात जोरात बोलण्यास सुरुवात केली. तो मोठमोठ्याने ओरडत चित्रपट पाहण्यास आलेल्या प्रेक्षकांना धमकावत ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट म्हणजे भाजप आणि आरएसएसचा मुस्लीम विरोधात खोटा प्रचार असल्याचे म्हणत होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्या विरोधातही तो बोलला. हा चित्रपट खोटा आहे, आम्ही हे सहन करणार नाही. हा चित्रपट फूट पाडण्यासाठी काढण्यात आला आहे, असे ओरडत ब्रिटनमध्ये हे होऊ देणार नाही असे तो ओरडू लागला. चित्रपटगृहाविरोधातही त्याने घोषणा दिल्या. सुरुवातीला चित्रपटगृहात उपस्थित असलेले प्रेक्षक त्याच्याकडे दुर्लक्ष करत होते, पण हा एक इस्लामोफोबिक चित्रपट आहे, तुम्हाला हा चित्रपट पाहताना लाज कशी वाटत नाही? असे तो म्हणू लागला तेव्हा प्रेक्षकांनी उठून त्याला विरोध करायला सुरुवात केली. काही वेळाने चित्रपटगृहाच्या कर्मचार्‍यांनी या तरुणाला बाहेर काढले, तेव्हा जाताना त्याने ‘फ्री काश्मीर’च्या घोषणाही दिल्या. ही संपूर्ण घटना एका प्रेक्षकाने रेकॉर्ड केली आणि सोशल मीडियावर हा व्हिडिओ टाकला. तेव्हा शकीलने हा व्हिडिओही फिरवला. हा व्हिडिओ सध्या खूप व्हायरल झाला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top