अहमदनगर – अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथे हिंदुत्ववादी संघटनांकडून आज भगवा मोर्चा काढण्यात आला. वाढती गुन्हेगारी आणि लव्हजिहाद विरोधात या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. संगमनेर तालुक्यातील अनेक गावांनी आज कडकडीत बंद पाळून मोर्चात सहभाग दर्शवला. मात्र या मोर्चाला गालबोट लागले. संगमनेरजवळील समनापूर गावात दोन गटात तुफान दगडफेक झाली आहे. मोर्चातून गावाकडे परतत असताना हा प्रकार घडला.
या दगडफेकीत एक जण जखमी झाला, तर अनेक दुचाकींसह मोठ्या गाड्यांचेही नुकसान झाले. परिस्थिती चिघळू नये म्हणून पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सध्या समनापूर गावात तणावाची परिस्थिती आहे. या वादाचे नेमके कारण अद्याप अस्प्ष्ट आहे. दरम्यान हिंदु समाजातील नागरिकांवर होणारे हल्ले, वाढती गुन्हेगारी आणि लव्ह जिहाद या प्रवृत्ती विरोधात हा भगवा मोर्चा काढण्यात आला होता. या माेर्चात सहभागी होण्यासाठी संगमनेरमध्ये अनेक गावांत कडकडीत बंद पाळण्यात आला होता. यात महिला व युवती देखील माेठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.