खंडाळा – सातारा- पुणे महामार्गावर बुधवारी भरधाव ट्रकने कारला धडक दिल्याची घटना घडली. या भीषण अपघातात कारमधील दोघांचा मृत्यू झाला तर, पाच जण गंभीर जखमी झाले. जखमींना खंडाळा येथील खासगी रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले. मृतांमध्ये १५ वर्षांचा मुलगा आणि एका महिलेचा समावेश आहे. दोघेही शिरुरमधील वडगाव रासई येथे राहत होते.
सातारा- पुणे महामार्गावर पारगाव येथे रस्त्यालगत चहाची टपरी आहे. बुधवारी रात्री काही प्रवासी तिथे चहा पिण्यासाठी थांबले होते. त्यावेळी तिथून जाणाऱ्या ट्रकचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. या ट्रकने टपरीजवळ थांबलेल्या कारसह आणखी काही वाहनांना धडक दिली. ही घटना रात्री ११:३० च्या सुमारास घडली. या भीषण अपघातात कारमधील दोन प्रवाशांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच खंडाळा पोलिस घटनास्थळी पोहोचले. जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. या प्रकरणी ट्रकचालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोलिसांनी तत्काळ सुरु केली. या मार्गावरील वाहतूक आता पूर्ववत सुरु आहे.