नवी दिल्ली – भविष्यात भारत असेल, पण हिंदू धर्म नसेल, असे खळबळजनक वक्तव्य दिल्ली आयआयटीच्या प्राध्यपिका दिव्या द्विवेदी यांनी केले आहे. जी-२० परिषदेमध्ये फ्रेंच प्रसिद्धी माध्यमांना दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केले. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. भूतकाळातील भारत होता, ज्यामध्ये जातिव्यवस्थेच्या आधारे मोठ्या प्रमाणात लोकांवर अत्याचार आणि दडपशाही करण्यात आली. परंतु भविष्यात एक भारत असा असेल, ज्या भारतात जातिव्यवस्थेच्या आधारे होणारा भेदभाव नसेल आणि हिंदू धर्मही नसेल, असे मत दिव्या यांनी व्यक्त केले.
त्या म्हणाल्या, की सध्या आर्य मानसिकता असणारा भारत जगासमोर मांडणे सुरू आहे. त्यामुळेच इंडिया ऐवजी भारत नावावर जोर दिला जातो आहे. भविष्यातील हिंदू-विरहित भारत अद्याप जगासमोर मांडला जात नाही. दिव्या पुढे म्हणाल्या, की गेल्या ३०० वर्षांहून अधिक काळ जातिव्यवस्था भारताला आकार देत आहे. देशात १० टक्के सवर्ण आहेत. मात्र तेच देशातील ९० टक्के शक्तिशाली आणि फायद्याच्या पदांवर विराजमान आहेत. हेच आजही सुरू आहे.
दिव्या यांनी यापूर्वी देखील हिंदू धर्माबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. हिंदू विसाव्या शतकाच्या सुरुवातीला स्थापन झालेला खोटा धर्म आहे., असे त्यांनी म्हटले होते. आयआयटी दिल्लीतील ह्युमॅनिटीज अँड सोशल सायन्सेस विभागात दिव्या असोसिएट प्रोफेसर आहेत. त्या मार्क्सवादी विचारसणीला पाठिंबा देतात. सोबतच, त्यांनी हिंदुफोबिया, आँटोलॉजी, मेटाफिजिक्स, साहित्य आणि राजकीय तत्त्वज्ञान अशा विषयांवर लेखनदेखील केले आहे.
भविष्यात भारतात हिंदू धर्म नसेल! प्राध्यापिका दिव्या द्विवेदींचे वक्तव्य
