बंगळुरू – कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपने आपल्या ३१ पैकी २५ मंत्र्यांना निवडणुकीचे तिकीट दिले होते. पण त्यापैकी तब्बल १३ मंत्र्यांचा पराभव झाला आहे. हा भाजपसाठी सर्वात मोठा झटका मानला जात आहे. मुधोला मतदार संघातून निवडणूक लढविललेले जलसंपदा मंत्री गोविंदा करजोला यांना कॉंग्रेसच्या आरबी थिम्मापुरा यांनी पराभूत केले आहे. बेल्लारी ग्रामीण मतदारसंघातून परिवहन मंत्री श्रीरामुलु यांना कॉंग्रेसच्या बी नागेंद्र यांच्याकडून पराभव पत्करावा लागला आहे. तसेच वरुणा मतदारसंघ आणि कामकाजनगर अशा दोन्ही ठिकाणी उभ्या राहिलेल्या गृहनिर्माण मंत्री व्ही. सोमण्णा यांना दोन्ही जागेवर पराभव पत्करावा लागला आहे. वरुणामध्ये सिद्धरामय्या हे विजयी झाले आहेत. तर कामराजनगर मतदारसंघात पुट्टारंगशेट्टी विजयी झाले आहेत. चिक्कनायकनहल्ली मतदारसंघात कायदा मंत्री जे. सी. मधुस्वामी यांना सुरेश बाबू यांनी पराभूत केले आहे. तसेच बायलागी विधानसभा मतदार संघात उद्योगमंत्री मुरुगेश निरानी यांना कॉंग्रेसच्या जे. टी. पाटील यांनी चितपट केले आहे.
हिरेकेरुरु विधानसभा मतदारसंघातून कृषिमंत्री बी. सी. पाटील यांना यू. बी. बनकर यांनी धूळ चारली आहे. चिक्काबल्लापूर मतदारसंघात शिक्षणमंत्री डॉ. के. सुधाकर यांच्यावर प्रदीप ईश्वर यांनी मात केली. होसकोटे विधानसभा मतदारसंघात व्यापार मंत्री एम.टी. बी.नागराज यांना हरवून शरत बचेगौडा यांनी विजयपताका फडकवली. के. आर. पेट मतदारसंघात क्रीडामंत्री नारायणगौडा यांना एच.टी.मंजू यांनी पराभूत केले. तिपातूर मतदारसंघात शिक्षणमंत्री बी.सी.नागेश यांना कॉंग्रेसच्या के. शडाक्षरी यांनी पराभवाची धूळ चारली आहे .या शिक्षणमंत्र्यानी कॉलेजमध्ये हिजाबवर बंदी घातली होती. येलबुर्गा विधानसभा मतदारसंघात खाण मंत्री हलप्पा अचार यांना बसवराज रायरेड्डी यांच्यासमोर पराभव स्वीकारावा लागला. नवलगुंड मतदारसंघातून वस्त्रोद्योगमंत्री शंकर मुनेकोप्पा यांना एनएच कोनरेड्डी यांच्याकडून हात पत्करावी लागला आहे.
भाजपच्या २५ पैकी १३ मंत्र्यांना कर्नाटक जनतेने घरी बसवले
