भाजपा हे नाव समृध्दीचे आणि
विश्वासाचे! फडणवीसांचे वक्तव्य

मुंबई – भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष व भाजपचे विधान परिषद प्रतोद आमदार प्रसाद लाड यांच्या, सायन सर्कल येथील जनसंपर्क कार्यालयात भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस साजरा करण्यात आला. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसदेखील उपस्थित होते.
यावेळी फडणवीस यांच्या हस्ते भाजपचा ध्वज फडकविण्यात आला. ’भाजपा’ हे नाव समृध्दीचे आणि विश्वासाचे असल्याचे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थापना दिनाच्या निमित्ताने व्यक्त केले आहे. तसेच त्यांनी यावेळी सर्व कार्यकर्त्यांना आणि पदाधिकार्‍यांना स्थापना दिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नारळ वाढवून, दोन रुग्णवाहिकांचे लोकार्पणदेखील करण्यात आले. दरम्यान लोकसभेच्या सर्व जागा जिंकण्याचा संकल्प करा असे आवाहन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्ष कार्यकर्त्यांना केले.

पुढील वर्षी होणार्‍या लोकसभा निवडणुकीत भाजपा-शिवसेना युतीसह सर्वच्या सर्व 48 जागा जिंकण्याचा आणि विधानसभा निवडणुकीत 200 पेक्षा अधिक जागा मिळवण्याचा संकल्प करा, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी केले. भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनानिमित्त भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बावनकुळे बोलत होते. बावनकुळे म्हणाले की , अत्यंत प्रतिकूल काळात हजारो कार्यकर्त्यांनी जनसंघ आणि त्यानंतर भाजपा ची विचारधारा रुजविण्यासाठी प्रयत्न केले. या कार्यकर्त्यांनी केलेल्या त्यागावरच आज पक्ष उभा आहे. भारतीय जनता पार्टीची स्थापना करताना अटलबिहारी वाजपेयी यांनी समृद्ध, विकसित, बलशाली भारताचे स्वप्न पाहिले होते. नरेंद्र मोदी यांनी अटलजींनी पाहिलेले सर्वश्रेष्ठ भारताचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्याच्या दिशेने पावले टाकली आहेत. त्यामुळेच भारत हा जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेला देश बनला आहे.
यापुढील काळात राज्यात पक्ष वाढविण्यासाठी कार्यकर्त्यांनी पक्षाने दिलेल्या विविध कार्यक्रमांची अंमलबजावणी करून मोदी सरकार आणि राज्यातील शिंदे – फडणवीस सरकारची विकास कामे सर्वसामान्य माणसापर्यंत पोहचविली पाहिजेत. 3 कोटी नवे सदस्य बनविण्याचे अभियान यशस्वी करण्याचा आणि शिवसेना युतीसह लोकसभेच्या सर्व 48 जागा, विधानसभेच्या 200 पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी स्थापना दिनाच्या निमित्ताने केला पाहिजे, असेही बावनकुळे यांनी सांगितले.

Scroll to Top