नांदेड – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारमधील कारकिर्दीला ९ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या जनसंपर्क अभियानांतर्गत केंद्रीय गृहमंत्री आणि ज्येष्ठ भाजपा नेते अमित शाह महाराष्ट्र दौर्यावर येणार आहेत. १० जून रोजी नांदेडमध्ये त्यांची सभा होणार आहे.
भाजपाच्या मोदी मिशन २०२४ अंतर्गत केंद्र सरकारच्या कामांचा प्रचार करण्यासाठी अमित शाह देशभरात दौरे करणार आहेत. १० जूनला संध्याकाळी ५ वाजता शाह जाहीर सभा घेणार आहेत. या सभेत ते केंद्र सरकारच्या कामांचा प्रचार व प्रसार करणार आहेत. महाराष्ट्रात या प्रचाराची सुरुवात मुंबईपासून करायचे ठरले होते. मात्र तो दौरा रद्द करण्यात आला. यानंतर पुणे किंवा छत्रपती संभाजीनगर यांपैकी एका ठिकाणी त्यांची सभा होण्याची चर्चा सुरु होती. मात्र ज्या ठिकाणी पक्षाची ताकद कमी आहे किंवा पक्षाच्या प्रचार कमी झाला आहे, अशा ठिकाणी सभा घेण्याचे भाजपने ठरवले आहे. नांदेडमध्ये सभा घेतल्याने हिंगोली, लातूर, परभणी आणि नांदेड अशा चार जिल्ह्यांमध्ये प्रचार करता येईल. त्यामुळे या ठिकाणी २०२४ च्या दृष्टीने भाजपाची राज्यातील पहिली जाहीर सभा नांदेडमध्ये घेणार आहेत.