भारताच्या जीडीपी अंदाजात
जागतिक बँकेकडून कपात

नवी दिल्ली :

येत्या आर्थिक वर्षासाठी जागतिक बँकेने भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनच्या (जीडीपी) विकासदराचा अंदाज घटवला आहे. मंगळवारी जारी झालेल्या अहवालात जागतिक बँकेने म्हटले आहे की, उत्पन्न मंदावल्याने खरेदी घटली आहे, यामुळे भारताच्या जीडीपीचा विकासदर ६.३ टक्के राहू शकतो.

जागतिक बँकेने आपल्या \’इंडिया डेव्हलपमेंट अपडेट\’ मध्ये म्हटले आहे की, ग्राहकोपयोगी वस्तूंच्या विक्रीत घट आणि आव्हानात्मक बाह्य परिस्थितीमुळे विकासाला अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. महागडे कर्ज आणि फार उत्पन्न वाढ नसल्यामुळे विक्रीवर परिणाम होईल. कोरोना महामारी संबंधित वित्तीय सहाय्य उपाय मागे घेतल्याने सरकारकडून खरेदीतील वाढ मंदावण्याची अपेक्षा आहे, असे अहवालात म्हटले आहे. अहवालात चालू खात्यातील तूट आर्थिक वर्ष २४ मध्ये २.१ टक्क्यांपर्यंत खाली येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, जी गेल्या आर्थिक वर्षात तीन टक्के होती. नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात किरकोळ महागाईचा दर ६.६ टक्क्यांवरून ५.२ टक्क्यांवर येईल, असे जागतिक बँकेच्या अहवालात म्हटले आहे.

जीडीपी वाढीच्या अंदाजात सुधारणा केली असली तरी, भारत अजूनही जगातील सर्वांत वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे, असे जागतिक बँकेचे भारतातील संचालक ऑगस्टे तानो कौमे यांनी म्हटले आहे.

Scroll to Top