मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघात एमआयडीसी स्थापन व्हावी यासाठी विधिमंडळाच्या प्रांगणात दोन दिवसांपूर्वी भरपावसात आंदोलन केले. मात्र त्यांनी ज्या जमिनीवर एमआयडीसी स्थापन करण्याची मागणी केली ती जमीन कोट्यवधींचा बँक घोटाळा करून परदेशात पसार झालेला हिरे व्यापारी नीरव मोदी याची असल्याचा दावा आज अधिवेशनात झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. रोहित पवार यांनी जे आंदोलन केले ते स्थानिकांसाठी होते की नीरव मोदीच्या फायद्यासाठी होते? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
कर्जत – जामखेड मतदारसंघाचे भाजपचे आमदार राम शिंदे यांनी विधान परिषदेत म्हटले की, या परिसरात एमआयडीसी व्हावी याबद्दल कुणाचेही दुमत नाही. कर्जत एमआयडीसीचा विषय मी याआधीही अनेकदा मांडलेला आहे. त्यामुळे मतदारसंघातील शेतकरी आणि युवकांना रोजगार मिळावा अशीच माझी पहिल्यापासूनची भूमिका असून, लवकरात लवकर एमआयडीसीची अधिसूचना निघावी. या भागातील बेरोजगारांच्या हातांना काम मिळाले पाहिजे. पण रोहित पवार ज्या जमिनीवर एमआयडीसी आणण्याचा आग्रह धरीत आहेत त्याच जागेवर एमआयडीसी कशासाठी पाहिजे? या जमिनींचे मालक नीरव दीपक मोदी, मनिषा कासोले, नयन अग्रवाल, कमलेश शाह, पंकज विनोद खन्ना, गणेश अग्रवाल आहेत. त्यामुळे आपण येथील बेरोजगारांना काम मिळवून देण्यासाठी एमआयडीसी करत आहात की येथील उद्योजक व गुंतवणूकदारांच्या कल्याणासाठी एमआयडीसी करत आहात, अशी विचारणा राम शिंदे यांनी केली.
कर्जत एमआयडीसीसाठी जिंदाल, एशियन पेंट्स, अदानी या कंपन्यांबरोबर चर्चा झाल्याचा दावा करत आहेत. हे उद्योग कर्जतमधील भविष्यात होणार्या एमआयडीसीमध्ये येण्यास तयार असतील तर ते जामखेडमध्ये का आले नाहीत? जामखेडमध्ये एमआयडीसी होऊन 25 वर्षांपेक्षा जास्त कालावधी लोटला. पण अद्याप तिथे एकही उद्योग आला नाही, अशीही माहिती शिंदे
यांनी केली.
उद्योगमंत्री उदय सामंत या चर्चेला उत्तर देत म्हणाले की, 1986 मध्ये जामखेड येथे एमआयडीसी झाली. तिथे उद्योग येण्यासाठी सरकार प्रयत्न करील. तर कर्जतमध्ये एमआयडीसी स्थापन करण्याबाबत 2016 मध्ये पहिली बैठक झाली. त्यानंतर स्थळपाहणी झाली. भूनिवड समितीनेही सकारात्मकता दाखवली. तत्कालीन मृद् व जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी पत्र दिले. कर्जत, पाटेगाव, खंडाळा या भागाची भूनिवड समितीने पाहणी केली. परंतु येथील जमिनीचे मालक नीरव मोदी व अग्रवाल असतील तर ते धक्कादायक आहे. ही जागा नेमकी कुणाची आहे, हा नीरव मोदी कोण आहे, तो लंडनला पळालेलाच नीरव मोदी आहे का, याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.
या जागेला पाणीपुरवठा करण्यासाठी जलसंपदा विभागाने कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही. याच भागात माळढोक पक्षी अभयारण्य तसेच त्यांची बफर जमीनही आहे.
ही जागा वगळता वन्यजीव संरक्षणाचा कायदा लक्षात घेऊन उरलेली जमीन सलग आहे का, याची तपासणी होणे गरजेचे आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्यानंतरच येथील एमआयडीसीविषयी अंतिम निर्णय घेतला जाईल, असेही सामंत यांनी यावेळी स्पष्ट केले. आता या एमआयडीसीवरून आमदार शिंदे यांनी केलेल्या गौप्यस्फोटामुळे रोहीत पवार मात्र अडचणीत आले आहेत.
भारतातून पळून गेलेला हिरे व्यापारी नीरव मोदीसाठी रोहित पवारांचे आंदोलन?
