कोलकाता : पाच दशकांपासून भारतात प्रकाशित होणारे एकमेव चिनी वृत्तपत्र सेओंग पॉ बंद झाले आहे. कोलकात्यातून प्रकाशित होणारे हे वृत्तपत्र मँडरिन भाषेत छापले जायचे. मँडरिन ही चीनची मुख्य आणि अधिकृत भाषा आहे. हे वृत्तपत्र ली युन चिन यांनी १९६९ मध्ये सुरू केले होते. त्याचा शेवटचा अंक मार्च २०२० मध्ये आला होता. कोरोना महामारीमुळे देशात लॉकडाऊन असताना या वृत्तपत्राच्या कार्यालयालाही टाळे लावण्यात आले होते जे पुन्हा कधीही उघडू शकले नाही. चिनी लोकांची लोकसंख्या कोलकात्यातील टांगरा भागात कमी आहे. त्यांच्यासाठी हे वर्तमानपत्र काढले जात असे. २०२० मध्ये कोरोना महामारीनंतर कू साई चांग या वृत्तपत्राच्या संपादकाने त्याचे प्रकाशन थांबवण्याचा निर्णय घेतला. त्याच वर्षी त्यांचे निधन झाले. त्यांचा मृत्यू हा वृत्तपत्र बंद करण्याचे अखेरचे निमित्त ठरले. तसेच टांगरामधील काही तरुणांना मँडरीन नीट लिहिता किंवा वाचता येत नाही. यामुळेच सेओंग पॉ चे प्रकाशन चालू ठेवणे अशक्य असल्याचे चायनीज असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष चेन याओ हुआ यांनी म्हटले आहे.
भारतातून प्रकाशित होणारे सेओंग पॉ चिनी वृत्तपत्र बंद
