चीनचा केला निषेध
नवी दिल्ली :
चीनने भारतातील वुशू संघातील तीन खेळाडूंना स्टेपल व्हिसा जारी केल्याबाबत चीनच्या या कृत्याचा केंद्र सरकारने निषेध केला आहे. चीनच्या या भूमिकेमुळे
केंद्र सरकारने संघातील सर्व खेळाडूंना ‘वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्स’ स्पर्धेत सहभागी होण्यापासून मज्जाव करत विमानतळावरून माघारी बोलावले.
वुशू संघातील हे तिन्ही खेळाडूं अरुणाचल प्रदेशातील रहिवासी आहेत. ११ सदस्यीय भारतीय संघ चीनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्स’ स्पर्धेत सहभागी होण्यासाठी चीनला रवाना होणार होता. परंतु चीनने भारतातील वुशू संघामधील सहभागी होणाऱ्या अरुणाचल प्रदेशातील तीन खेळाडूंना साधारण व्हिसा देण्याऐवजी स्टेपल व्हिसा जारी केला. चीनच्या या भूमिकेचा निषेध नोंदवत केंद्र सरकारने संघातील सर्व खेळाडूंना विमानतळावरून माघारी बोलावले. याप्रकरणी परराष्ट्र मंत्रालयाने चीनच्या या भूमिकेचा निषेध नोंदवला असून हे अस्वीकार्य आहे, त्यामुळे वुशू संघासह इतरही खेळाडू चीनमधील आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार नाही असे म्हटले.
स्टेपल व्हिसा म्हणजे काय?
स्टेपल व्हिसा हा इतर व्हिसाच्या तुलनेने वेगळा असतो. सामान्य व्हिसामध्ये पासपोर्टवर शिक्का मारला जातो. मात्र, स्टेपल व्हिसामध्ये स्वतंत्र व्हिसाचा कागद स्टेपल करून त्यावर शिक्का मारला जातो. प्रवासी देशात परतल्यावर संबंधित देशाचा अधिकारी हा कागद आणि तिकीट फडतात. त्यामुळे व्हिसावर प्रवासाचा कोणताही तपशील राहत नाही.