भारती विद्यापीठाचा १० मे रोजी ५९ वा वर्धापन दिन समारंभ

पुणे : भारती विद्यापीठाचा ५९ वा वर्धापन दिन समारंभ बुधवार दि. १० मे २०२३ रोजी दुपारी ३ वाजता भारती विद्यापीठ शैक्षणिक संकुल, सातारा रोड, धनकवडी, पुणे ४३ येथे होणार आहे. या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत तर सन्माननीय अतिथी म्हणून महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर उपस्थित राहणार आहेत. या मान्यवरांच्या हस्ते वैद्यकीय महाविद्यालयाच्या विस्तारित इमारतीचे भूमिपूजन होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भारती विद्यापीठाचे कार्यवाह आमदार डॉ. विश्वजीत कदम हे भूषविणार आहेत.
संस्थेच्या यशाच्या वाटचालीत सेवाकाळात योगदान देणाऱ्या सेवकांना यावेळी ‘डॉ.पतंगराव कदम सेवा गौरव पुरस्कार’ प्रदान केला जाणार आहे, अशी माहिती संस्थेचे कार्यवाह आमदार डॉ.विश्वजीत कदम यांनी दिली. ते म्हणाले, भारती विद्यापीठाचे संस्थापक कुलपती डॉ. पतंगराव कदम यांनी स्थापन केलेल्या भारती विद्यापीठाने ‘गतिमान शिक्षणातून समाज परिवर्तन’ हे ब्रीद घेऊन गेल्या ५८ वर्षात देशाच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक प्रगतीत मोलाचे योगदान दिले आहे. ते देताना सामाजिक बांधिलकी जपली आहे. काळाची पावले ओळखून व्यवसायाभिमुख शिक्षण समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्याचे काम भारती विद्यापीठाने केले आहे. गुणवत्तेशी तडजोड न करता दिलेल्या दर्जेदार शिक्षणामुळे भारती विद्यापीठाचा देशभर नावलौकिक आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top