नवी दिल्ली – लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतसे राजकारण अधिक व्यापक व सखोल बनत चालले आहे. हिंदू मतांवर सर्वस्वी अवलंबून असलेल्या भाजपाकडून ‘हिंदू राष्ट्र’, ‘हिंदुत्त्व’, ‘लव जिहाद’, हे विषय पुढे आणले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ‘हिंदुराष्ट्र’साठी सोमवार 1 मे रोजी सर्व हिंदुंनी बंद पाळावा, असा संदेश सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
सोशल मीडियावरील संदेशात म्हटले आहे की, पंतप्रधान मोदींना भारत देश हे हिंदू राष्ट्र म्हणून घोषित करायचे आहे. यासाठी सोमवार 1 मे रोजी सर्व हिंदुंनी कडकडीत बंद पाळून हिंदू राष्ट्राच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे. यात पुढे म्हटले आहे की, सर्व धार्मिक संघटनांनी 1 मे रोजी बंद पाळण्याचे आवाहन केले आहे. सनातन धर्म पाळणार्या हिंदुंनी यात सहभागी झाले पाहिजे. हिंदू ध्वज हाती घेऊन प्रथमच हिंदू धर्मासाठी लढायचे आहे. यासाठी 1 मे रोजी भारतातील सर्व हिंदुंनी बंद पाळून रस्त्यावर उतरावे. या दिवशी ताकद दाखविली तरच हिंदू राष्ट्राचे
स्वप्न पूर्ण होईल.
हिंदू संघटनांकडून हा संदेश फिरत असतानाच शिवसेनेतही ‘महाराष्ट्र’ चे ‘शिवराष्ट्र’ करण्याची कुजबूज आहे. या आशयाचे पोस्टर काही ठिकाणी लावण्यात आले आहेत. ‘महाराष्ट्र’ राज्याचे नाव ‘शिवराष्ट्र’ करा, अशी मागणी शिवसेना करणार असल्याचे बोलले जात आहे.
भारत ‘हिंदू राष्ट्र’ घोषणेसाठी मोदींना पाठिंबा! सोमवारी ‘बंद’
