नागपूर – अजित पवार, सुप्रिया सुळे, देवेंद्र फडणवीस यांसह काही नेत्यांची भावी मुख्यमंत्री अशी पोस्टर्स राज्यात झळकली असताना या यादीत आता आदित्य ठाकरे यांचा समावेश झाला आहे. आदित्य ठाकरेंना भावी मुख्यमंत्री म्हणून संबोधणारे बॅनर्स सोमवारी नागपूरमध्ये झळकले. ठाकरे गटाचे युवा सेना जिल्हाप्रमुख लोकेश बावनकर आणि उपजिल्हाप्रमुख समीर मेश्राम यांनी हे बॅनर लावले आहेत.
आदित्य ठाकरे हे सोमवारी नागपूरच्या दौऱ्यावर होते. नागपूरमधील रामटेक आणि कन्हान येथील रस्ते, तसेच बस स्टॉपवर त्यांच्या स्वागताचे बॅनर्स लागले होते. या बॅनरवर भावी मुख्यमंत्री आदित्य ठाकरे साहेब, आपले रामटेक विधानसभा मतदारसंघात हार्दिक स्वागत, असा मजकूर होता. या बॅनरवर शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचेही यांच्यासह बावनकर आणि मेश्राम यांचेही फोटो आहेत. थेट आदित्य ठाकरेंना भावी मुख्यमंत्री संबोधणार्या या बॅनरची नागपूरमध्ये जोरदार चर्चा होत होती.