चेन्नई : सनातन धर्मावर सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर मद्रास उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे. भाषण स्वातंत्र्य हेटस्पीच होता कामा नये, असे विधान उच्च न्यायालयाने केले. यावेळी न्यायालयाने सनातन धर्म काय आहे, हे देखील सांगितले. न्या. एन. शेषशायी यांच्या खंडपीठाने ही टिप्पणी केली आहे.
न्यायमूर्तीं म्हणाले की, सनातन धर्म हा शाश्वत कर्तव्यांचा समूह आहे. ज्यामध्ये राष्ट्र, राजा, आई-वडील आणि गुरूंप्रती कर्तव्य आणि गरिबांची काळजी घेणे यासह इतर कर्तव्यांचा समावेश आहे. भाषण स्वातंत्र्य हा मूलभूत अधिकार असला तरी, तो द्वेषयुक्त भाषणात बदलू नये. विशेषत: जेव्हा आपले विधान धर्माशी संबंधित असेल. अशा भाषणाने कोणाच्याही भावना दुखावणार नाहीत याची काळजी घेणे गरजेचे आहे. समान नागरिक असलेल्या देशात अस्पृश्यता खपवून घेतली जाऊ शकत नाही.अस्पृश्यता पाळण्याबाबत सनातन धर्माच्या तत्त्वांमध्ये कुठेतरी परवानगी असली तरी, आता या तत्वांना समाजात जागा मिळू शकत नाही. कारण घटनेच्या कलम 17 ने अस्पृश्यता नाहीशी केली आहे. प्रत्येक धर्म श्रद्धेवर आधारित आहे. म्हणून, जेव्हा धर्माशी संबंधित बाबींमध्ये भाषण स्वातंत्र्य वापरले जाते, तेव्हा कोणीही दुखावला जाणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. भाषण स्वातंत्र्य द्वेषयुक्त भाषण असू शकत नाही.