भिवंडी तालुक्यातील मिरची
पिकावर फुलकिडीचा प्रादुर्भाव

भिवंडी – ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यात सध्या मिरची उत्पादक शेतकरी चिंतेत दिसत आहेत.कारण मिरची पिकावर थ्रीप्स म्हणजेच फुलकिडीचा प्रादुर्भाव झाला आहे.या रोगामुळे मिरची उत्पादन खुंटल्याने आता या शेतकर्‍यांना नुकसानभरपाई देण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य किसान सभेच्यावतीने करण्यात आली आहे.
नुकत्याच झालेल्या होळी सणाच्या काळात राज्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस कोसळला होता. या पावसाचा फटका भिवंडी तालुक्यात शेतपूरक वीटभट्टीचा व्यावसाय करणाऱ्यांना बसला असताना आता याच तालुक्यातील मिरची उत्पादक शेतकरी फुलकिडीमुळे हवालदिल झाला आहे.मिरची पिकामध्ये अतिशय घातक कीड म्हणजे थ्रिप्स म्हणजेच फुलकिड आहे.या किडीच्या प्रादुर्भावामुळे मिरचीची पाने आकसली जातात त्यामुळे प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये अडथळा येऊन अन्नग्रहण करण्याची क्रिया मंदावते. परिणामी त्याच्या पिकाच्या गुणवत्तेवर व उत्पादनावर परिणाम होतो.या तालुक्यातील अनेक शेतकरी हे मिरची पिकाचे उत्पादन घेत असतात.काही जण तर दुसर्‍याच्या शेतात भाडेतत्त्वावर पालेभाज्या आणि मिरची पीक घेत असतात.पण यंदा थ्रीप्स या फुलकिडीमुळे शेतकर्‍यांना नुकसानीत ढकलले आहे. त्यामुळे किसान सभेने या शेतकर्‍यांना शासनाने आर्थिक नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे.

Scroll to Top