भीमा नदी पात्रात बुडून कुटुंबातील चौघांचा मृत्यू

सोलापूर – जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातून एक भयानक घटना समोर आली आहे. तालुक्यातील सिद्धापूर येथील भीमा नदीच्या पात्रामध्ये एकाच कुटुंबातील चार जणांचा बुडून दुर्देवी मृत्यू झाला आहे. काल गुरूवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. मृतांमध्ये दोन लहान मुले आणि दोन महिलांचा समावेश आहे. या घटनेने मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

बालूदमाई करणसिंग नेपाळी (३५),मनसरादमाई महेंद्रसिंग नेपाळी (३३), हिरदेश महेंद्रसिंग नेपाळी (८),नमुना करणसिंग नेपाळी (११) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. हे चौघेजण जम्बुकांध, जिल्हा द्रेलेख राज्य, कर्णाली प्रदेश, नेपाळ देशातील आहेत. नेपाळ देशातील गुरखे उपजीविकेसाठी रात्रीचे गस्त घालण्यासाठी देशभर फिरत असून मंगळवेढा तालुक्यातील सिद्धापूर गावांमध्ये सहा दिवसापूर्वी आले होते. सिद्धापूर गावात एक भाड्याने घर घेऊन ही दोन कुटुंबे राहत होती.

काल सायंकाळी नेहमीप्रमाणे या गुरखा कुटुंबातील महिला कपडे धुण्यासाठी नजीकच्या भीमा नदीवर गेल्या होत्या. त्यांच्या सोबत लहान मुलेही होती. नदीकाठी खेळत खेळत पाण्यात गेली. परंतु नदीच्या पाण्याच्या प्रवाहात वाहून जात असताना महिलांच्या लक्षात आले. मुलांचे प्राण वाचविण्यासाठी दोन महिलांनी पाण्यात उड्या मारल्या आणि मुलांसह या महिलाही वाहून गेल्या. गावातील तरुणांनी नदीत उतरुन या चौघांचाही शोध घेतला. मात्र,कुणीही सापडले नाही. पोलिसांनी घटनास्थळ गाठत सायंकाळी उशिरापर्यंत बुडालेल्या चार जणांचा शोध घेतला. सर्वांना बाहेर काढून रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी चौघांनाही मृत घोषित केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top