रोम : मंगळावरून पृथ्वीवर पहिल्यांदाच संदेश पाठवण्यात आला आहे. आता शास्त्रज्ञ मंगळावरून मिळालेले सिग्नल अथवा संदेश डीकोड करण्याचा प्रयत्न करत आहेत. हा सिग्नल कोणा एलियनने पाठवलेला नसून युरोपियन स्पेस एजन्सीच्या एक्सोमर्स ट्रेस गॅस ऑर्बिटरने पाठवलेला आहे. मंगळाच्या कक्षेत फिरणाऱ्या टीजीओने २४ मे रोजी रात्री ९ वाजता हा सिग्नल पाठवला, जो १६ मिनिटांनी पृथ्वीवर आला.
‘ए साइन इन स्पेस’ प्रकल्पांतर्गत हा प्रयोग करण्यात आला. अन्य ग्रह किंवा एक्स्ट्राटेरेस्ट्रियल सिविलाइजेशनमधून पृथ्वीवर सिग्नल पाठवण्यात आला तर तो रिसिव्ह करता येऊ शकतो की नाही, हे जाणून घेण्यासाठी हा प्रयोग करण्यात आला आहे. टीजीओकडून पाठवलेला हा संदेश वेस्ट व्हर्जिनियामधील ग्रीन बँक टेलिस्कोप, इटलीमधील मेडिसिना रेडिओ एस्ट्रॉनॉमिकल स्टेशन, कॅलिफोर्नियामधील एलन टेलिस्कोप एरे आणि न्यू मेक्सिकोमधील व्हेरी लार्ज एरे यांनी प्राप्त केला.
सर्च फॉर एक्स्ट्राटेरेस्ट्रियल इंटेलिजेंस इन्स्टिट्यूटच्या शास्त्रज्ञ डॅनिएला डी पॉलिस यांनी, या प्रकारे सिग्नल किंवा संदेश प्राप्त करणे हा संपूर्ण मानवजातीसाठी एक मोठा परिवर्तनाचा अनुभव असेल, असे म्हटले आहे.