मंत्रिमंडळाची बैठक की इव्हेंट? उधळपट्टीवर विरोधकांची टीका

छत्रपती संभाजीनगर – दुष्काळाचे सावट असलेल्या मराठवाड्यात उद्या मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. मात्र या बैठकीसाठी करोडो रुपये खर्चून आलिशान व्यवस्था करण्यात आली आहे. पंचतारांकित हॉटेल, गाड्या आणि जेवणावळीवर करोडो रुपये खर्च करण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री स्वतःही नेहमीचे सरकारी सुभेदारी गेस्ट हाऊस सोडून रामा इंटरनॅशनल हॉटेलात 32,000 रुपये भाड्याच्या सूटमध्ये राहणार आहेत. हा थाटमाट पाहून ही मंत्रिमंडळ बैठक आहे की एखादा भपकेबाज इव्हेंट, असा प्रश्‍न विरोधकांकडून विचारला जात आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये उद्या (16 सप्टेंबर) राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी मराठवाड्यात येणार्‍या मुख्यमंत्र्यांचा मुक्काम सरकारी सुभेदारी विश्रामगृहात असतो. विलासराव देशमुख, अशोक चव्हाण, देवेंद्र फडणवीस यांनी याच विश्रामगृहात मुक्काम केला आहे. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दोन्ही उपमुख्यमंत्री 16 सप्टेंबरला रामा इंटरनॅशनल या फोर स्टार हॉटेलातील आलिशान सूटमध्ये राहणार आहेत.
पूर्वनियोजित कार्यक्रमात शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सुभेदारी विश्रामगृहात मुक्कामी असतील आणि उर्वरित मंत्री हॉटेलांमध्ये थांबतील, असे सांगितले जात होते. पण गुरुवारी सायंकाळी त्यात बदल झाला. मुख्यमंत्री शिंदे, अजित पवार, फडणवीसांच्या मुक्कामाची व्यवस्था हॉटेल रामामध्ये करण्यात आली. या हॉटेलच्या एका सूटचे दिवसाचे भाडे 32,000 रुपये असल्याची माहिती हॉटेलच्या वेबसाईटवर आहे. सुरक्षा व्यवस्थेमुळे हा बदल केल्याचे सांगितले जात असले तरी या आधीच्या मुख्यमंत्र्यांना सुरक्षा दिली जात नव्हती का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री आणि सर्व मंत्रीही हॉटेल रामा येथे राहणार आहेत. त्यांच्यासाठी तिथे 30 खोल्या बूक करण्यात आल्या आहेत. याव्यतिरिक्त सचिवांसाठी ताज हॉटेलमध्ये 40 खोल्या, उपसचिव, खासगी सचिव, कक्ष अधिकारी यांच्यासाठी अमरप्रीत हॉटेलमध्ये 70 खोल्या, इतर अधिकारी यांच्यासाठी अजंता अ‍ॅम्बॅसॅडरमध्ये 40 खोल्या बूक करण्यात आल्या आहेत. याव्यतिरिक्त नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर येथून प्रत्येकी 150 अशा 300 गाड्या भाड्याने घेण्यात आल्या आहेत. नम्रता कॅटरर्सला जेवणाचे कंत्राट देण्यात आले असून, एका थाळीची किंमत 1 हजार ते दीड हजार आहे. सरकारच्या या उधळपट्टीवर विरोधी पक्षांनी टीका केली आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, सरकारने जनाची नाही तर मनाची लाज बाळगली पाहिजे. मंत्री मराठवाड्यात पर्यटनासाठी येत आहेत का, असा प्रश्न आहे. फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये सोय करणारे हे पहिले सरकार आहे. सर्वाधिक आत्महत्या मराठवाड्यात होत आहेत. प्रत्येक जिल्ह्यात मागच्या ऑगस्टमध्ये शंभर-सव्वाशे आत्महत्या झाल्या आहेत. 96 तालुके दुष्काळाच्या छायेत आहेत. मराठवाडा दुष्काळाच्या छायेत असताना फाईव्ह स्टार व्यवस्था करून कॅबिनेट बैठक घेण्याची गरज काय? विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले की, 2016 मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात संभाजीनगर येथे मंत्रिमंडळ बैठक झाली होती. या बैठकीमध्ये मराठवाड्याच्या विकासासाठी 41 हजार कोटी रुपयांचा कालबद्ध कार्यक्रम घोषित करण्यात आला होता. परंतु त्यावेळी घेण्यात आलेल्या निर्णयांची अजूनही अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. सध्याच्या सरकारमध्ये फडणवीस हे सुपर सीएमच्या भूमिकेत आहेत. त्यांनी इतर अवास्तव घोषणा करण्यापेक्षा आपलीच कामे पूर्ण करावीत.

40,000 कोटींच्या घोषणांची शक्यता
मंत्रिमंडळाच्या या बैठकीत 40 हजार कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा होण्याची शक्यता आहे. सर्व विभागाने वेगवेगळे प्रस्ताव पाठवले आहेत. यामध्ये सर्वाधिक सिंचन प्रकल्पांच्या संदर्भात 13 ते 14 हजार कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा होणार आहे. मराठवाड्यात सात वर्षांनंतर मंत्रिमंडळ बैठक होत आहे. त्यामुळे आगामी निवडणुका समोर ठेवून योजनांचा वर्षाव होण्याची शक्यता आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top