मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या आई माधवी राजे यांचे निधन

ग्वाल्हेर

केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या आई राजमाता माधवी राजे सिंधिया यांचे आज निधन झाले. वयाच्या ७० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना सेप्सिस या आजाराने ग्रासले होते. गेल्या तीन महिन्यांपासून त्या दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (एम्स) रुग्णालयात दाखल होत्या. येथे उपचारादरम्यान आज सकाळी ९:२८ च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. उद्या त्यांच्या पार्थिवर अंत्यसंस्कार होणार असल्याचे सांगितले जाते.

माधवी राजे या मूळच्या नेपाळच्या राजघराण्यातील होत्या. त्यांचे आजोबा जुद्द शमशेर बहादूर नेपाळचे पंतप्रधान होते. ते राणा घराण्याचे प्रमुखही होते. लग्नापूर्वी माधवी राजे यांचे नाव राजकुमारी किरण राजलक्ष्मी देवी असे होते. १९६६ मध्ये माधवराव सिंधिया यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यांच्या शाही विवाहसोहळ्यात देश-विदेशातील पाहुणे उपस्थित होते. लग्नानंतर मराठी परंपरेनुसार नेपाळच्या राजकन्येचे नाव बदलण्यात आले. माधवी आणि माधवराव यांची सोयरीक ग्वाल्हेरच्या राजघराण्यातील राणी माता विजयराजे सिंधिया यांनी जुळवली होती. मार्च २०२० मध्ये, सिंधिया राजघराण्याचे प्रमुख ज्योतिरादित्य यांनी काँग्रेस सोडून भाजपामध्ये जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा संपूर्ण कुटुंब त्यांच्यासोबत होते. माधवी राजेंनीही त्यांना योग्य मार्गदर्शन करून सर्वाधिक पाठिंबा दिला होता. दरम्यान, माधवी राजे यांनी वर्षभरापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती. त्यावेळी ज्योतिरादित्य सिंधिया, सुन प्रियदर्शनी सिंधिया आणि नातू महाआर्यमान सिंधियाही त्यांच्या बरोबर होते. त्यानंतर त्या ग्वाल्हेरमध्ये झालेल्या काही सार्वनजिक कार्यक्रमांमध्ये दिसल्या होत्या. मागच्या तीन महिन्यांपासून त्यांची प्रकृती ढासळली होती. कोरोनानंतर त्यांच्या फुफ्फुसांना संसर्ग झाला होता. माधवी राजे यांच्या जाण्याने संपूर्ण कुटुंबात दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top