भोपाळ :मंदिराच्या कारभारात प्रशासनाची ढवळाढवळ असते, त्यांच्याकडील अधिकार काढून मंदिरातील पुजाऱ्यांना मिळावेत, अशी मागणी अनेक दिवसांपासून होत असतानां, आता मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मंदिरांच्या जमिनीच्या लिलावाबाबत मोठी घोषणा केली आहे. मंदिरांच्या कामांवर सरकारचे कोणतेही नियंत्रण राहणार नाही. मंदिरांच्या नावावर असलेल्या जमिनीचा आता जिल्हाधिकारी लिलाव करणार नाहीत. त्या जमिनीचा लिलाव करण्याचा अधिकार आता फक्त पुजाऱ्यालाच देण्यात येणार असल्याचे चौहान यांनी सांगितले.
भोपाळमध्ये परशुराम जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. तसेच ब्राह्मणांनी नेहमी धर्माचे रक्षण केले आहे. त्यामुळे मध्य प्रदेशातील धर्म आणि संस्कृतीचे रक्षण करणाऱ्या ब्राह्मणांच्या कल्याणासाठी ब्राह्मण कल्याण मंडळ स्थापन करण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली. मध्यप्रदेशातील ज्या जागा मंदिरांकडे आहेत त्याचा लिलाव करण्यात येणार आहे. शिवराज सिंह चौहान म्हणाले, सरकारकडून कोणत्याही मंदिराच्या व्यवहारांवर नियंत्रण नसेल. त्यामुळे जेवढी जमीन मंदिरांच्या नावावर आहे तेवढ्या जमिनीचा लिलाव जिल्हाधिकारी करू शकणार नाहीत. त्या जमिनीचा लिलाव केवळ पुजाऱ्यांनाच करता येईल. याशिवाय जी खासगी मंदिरे आहेत आणि जिथे विश्वस्त मंडळ तयार करण्यात आले आहे तेथेही पुजाऱ्यांना सन्मानजनक मानधन देण्याचे नियम तयार करून निर्देश दिले जातील.