मडगाव – गोव्यातील मडगाव पालिकेला या शहरातील कचर्याची विल्हेवाट लावण्यासाठी पालिकेला जागाच मिळत नाही. त्यामुळे आता प्रभागातील बांधकामाचा कचरा त्याच प्रभागातील सखल भागात टाकावा आणि अन्य कचर्यावर प्रक्रिया करावी, असा तोडगा काढण्यात आला आहे.
गोवा उच्च न्यायालयाने कदंब बस स्थानकाजवळ कचरा टाकण्यास बंदी घातली आहे.या पार्श्वभूमीवर मडगाव पालिकेत नगरसेवकांची एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत हा कचर्याबाबत तोडगा काढण्यात आला आहे. यावेळी तात्पुरता प्रभागनिहाय कचरा टाकण्यावर एकमत झाले. त्याचबरोबर कचरा टाकण्यासाठी दुसर्या जागेचा शोध घेण्याचे या बैठकीत ठरले.आता यापुढे प्रत्येक प्रभागातील कचऱ्यावर प्रभागात खुली जागा पाहून त्याठिकाणी प्रक्रिया केली जाणार आहे. त्याचप्रमाणे बांधकामाच्या कचऱ्याची तेथील सखल भागात विल्हेवाट लावली जाणार आहे. सोनसडो येथील कचर्याचा प्रश्न कायम असून कदंब स्थानकाजवळही कचरा टाकण्यास न्यायालयानेच मज्जाव केला आहे. त्यामुळे आता प्रभागनिहाय तोडगा काढण्यात आला आहे.