नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत येऊन मणिपूरच्या मुद्द्यावर भाष्य करावे या मागणीवर विरोधक ठाम आहेत.विरोधकांनी आजही संसदेच्या परिसरात काळे कपडे घालून निषेध नोंदवला . यावेळी विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटले की, सत्ताधारी पक्ष आमचे तोंड बंद करण्यासाठी गोंधळ करत आहेत. सरकार आम्हाला काही बोलूच देत नाही. या आधी सत्ताधारी पक्षाने कधीच असे केले नव्हते.पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संसदेचा अपमान करत आहेत. त्यांना राजस्थानमध्ये जाऊन भाषण करता येते , पण संसदेत येऊन बोलायला त्यांच्याकडे वेळ का नाही ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. २९ आणि ३० जुलै रोजी विरोधी पक्षांचे शिष्टमंडळ मणिपूरच्या दौऱ्यावर जाणार आहे.
विरोधकांनी काळे कपडे घालून संसदेच्या परिसरात आंदोलन केले. यावर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांनी म्हटले की, काळे कपडे घातलेल्या लोकांना देशाची वाढती ताकद अजून माहित नाही. ज्यांचे शरीर आणि मन दोन्ही काळे आहे त्यांच्या मनात दुसरे काय असणार? या लोकांचे वर्तमान, भविष्य आणि भूतकाळ काळे आहे. विरोधकांच्या आयुष्यात देखील कधी प्रकाश येणार नाही अशी आम्हाला खात्री आहे. दरम्यान, लोकसभेत दोन आणि राज्यसभेत एक विधेयक मंजूर करण्यात आले.राज्यसभेने सिनेमॅटोग्राफ (दुरुस्ती) विधेयक मंजूर केले, ज्यात पायरसीसाठी 3 वर्षांचा तुरुंगवास आणि उत्पादन खर्चाच्या 5% दंडाची तरतूद आहे.