इंफाळ
मणिपूरमध्ये भारतीय लष्कराच्या जवानाचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. इंफाळच्या खुनिंगथेक गावात लष्कराच्या जवानाचा मृतदेह सापडला आहे. सेर्टो थांगथांग कोम असे या सैनिकाचे नाव आहे. तो लष्कराच्या डिफेन्स सिक्युरिटी कॉर्प्स प्लाटूनमध्ये होता. सध्या कांगपोकपी जिल्ह्यातील लेमाखॉंग येथे तैनात होते.
कोम हे सुट्टीवर इंफाळ पश्चिम येथील आपल्या घरी आले होते. शनिवारी सकाळी अज्ञात सशस्त्र लोकांनी कोम यांचे घरातून अपहरण केले. त्यांच्या १० वर्षांच्या मुलाने सांगितले की, तीन लोक आमच्या घरात घुसले. त्यावेळी मी आणि वडील घरामध्ये काम करत होतो. अज्ञात बंदूकधाऱ्यांनी वडिलांच्या डोक्यावर पिस्तूल ठेवले. त्यांना पांढऱ्या रंगाच्या वाहनात बसवून तिथून पळ काढला. रविवारी सकाळपर्यंत कोम यांची कोणतीही माहिती मिळत नव्हती. रविवारी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास इंफाळच्या पूर्वेतील सोगोलमांग पोलिस स्टेशनच्या खुनिंगथेक गावात त्यांचा मृतदेह सापडला. त्यांच्या भावाने कोम यांचा मृतदेह ओळखला. कोम यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे.
कुटुंबीयांच्या इच्छेनुसार अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. जवानाच्या कुटुंबाला शक्य ती सर्व मदत करण्यासाठी सैन्याचे एक पथक त्यांच्या घरी पोहोचले आहे. भारतीय सैन्य या भ्याड हत्येचा तीव्र शब्दात निषेध करते आणि या कठीण प्रसंगी त्यांच्या शोकाकुल कुटुंबासोबत उभे राहील, असे सैन्याच्या वतीने सांगण्यात आले आहे.