मते वेगवेगळी असतात पण आमच्यात गैरसमज नाही

सातारा – कार्यकर्त्याच्या आग्रहामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा परत घेतला असल्याचे म्हणत, पक्ष पुढे कसा नेता येईल हे सहकाऱ्यांना माहित असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. ‘गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये कुरबुरी पाहायला मिळत आहेत. परंतु या टीकेचा महाविकास आघाडीवर काहीच परिणाम होणार नसल्याचे ते म्हणाले. वेगवेगळी मते असतात. पण त्यामुळे आमच्यात गैरसमज नाहीत,’ असेही शरद पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.

शरद पवारांनी आज साताऱ्यात रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. काँग्रेसचे जेष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादीला लक्ष्य करत, कर्नाटकमध्ये बोलताना अजित पवार भाजपमध्ये जाणार असून, राष्ट्रवादी काँग्रेस ही भाजपची बी टीम असल्याचे म्हटले. तर दुसरीकडे पवार यांना पक्षाचा वारसदार ठरविण्यात अपयश आल्याची टीकाही ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केली आहे. आता या संपूर्ण घटनांवर शरद पवार यांनी भाष्य केले. पृथ्वीराज चव्हाणांचे त्यांच्या पक्षात स्थान ए आहे की बी, सी आहे की डी हे त्यांनी आधी चेक करावे असा खोचक टोला लगावत आम्ही काय केले हे राऊतांना माहिती नाही, त्यांच्या बोलण्याकडे फारसे लक्ष देत नसल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top