मुंबई
मुंबई रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर उद्या मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा – मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर, तर हार्बर मार्गावरील पनवेल वाशी अप आणि डाउन मार्गावर हा मेगाब्लॉक असणार आहे. मुंबई उपनगरीय रेल्वे रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक कामे करण्यासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
मध्य रेल्वेच्या माटुंगा-मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर सकाळी ११:०५ ते दुपारी ३:५५ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत सीएसएमटी येथून सुटणाऱ्या जलद मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. ठाण्याच्या पुढे या जलद गाड्या डाउन जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. तर ठाणे येथून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड आणि माटुंगा दरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. त्या नियोजित थांब्यांवर येणार आहेत. त्यानंतर अप जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येणार आहेत.
या गाड्या गंतव्यस्थानी नियोजित वेळेच्या १५ मिनिटे उशिराने पोहचतील. तर हार्बर रेल्वे पनवेल- वाशी अप आणि डाउन मार्गावर सकाळी ११:०५ ते दुपारी ४:०५ वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहेत. यादरम्यान, पनवेल येथून मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि सीएसएमटी येथून पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहणार आहेत. पनवेल येथून सुटणारी ठाण्याकडे जाणारी अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे येथून पनवेलकरता जाणारी डाउन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द असेल. या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई- वाशी दरम्यान विशेष लोकल धावणार आहेत. तसेच बेलापूर- खारकोपर आणि नेरुळ-खारकोपर दरम्यान लोकल ट्रेन वेळापत्रकानुसार धावणार आहेत.