मध्य रेल्वेवर आज मेगाब्लॉक

मुंबई – मध्य रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक असणार आहे. ठाणे-कल्याण या स्थानकांवर सकाळी १०.४० ते दुपारी ३.४० या वेळेत हा मेगाब्लॉक घेण्यात येईल. नियमित देखभाल, दुरुस्ती व अभियांत्रिकी कामासाठी मध्य रेल्वेकडून हा मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ९.३० ते दुपारी २.४५ या वेळेत सुटणाऱ्या जलद लोकल ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान धीम्या रेल्वे रुळावर वळवण्यात येतील. या गाड्या त्यांच्या पूर्वनियोजित थांब्यांव्यतिरिक्त कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकांवर थांबणार असूच त्याच्या निर्धारित वेळेपेक्षा १० मिनिटे उशिराने स्थानकावर येणार आहेत. तर, कल्याणहून सकाळी १०.२८ ते दुपारी ३.२५ या वेळेत सुटणाऱ्या जलद लोकल कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान धीम्या रेल्वे रुळावर वळवल्या जातील. या गाड्या त्यांच्या पूर्वनियोजित थांब्यांव्यतिरिक्त दिवा, मुंब्रा आणि कळवा स्थानकांवर थांबून पुन्हा जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. या गाड्या देखील १० मिनिटे उशिराने स्थानकावर पोहोचणार आहेत.

Scroll to Top