मनसेच्या संदीप देशपांडेंवर चार अज्ञातांचा हल्ला

मुंबई- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर आज पहाटे प्राणघातक हल्ला झाला. मॉर्निंग वॉकसाठी गेले असताना त्यांच्यावर चार अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला. ही घटना दादर शिवाजी पार्क येथे घडली. हल्लेखोरांनी हल्ला करताना चेहरे झाकलेले होते. संदीप देशपांडे एकटेच मॉर्निंग वॉकसाठी गेले असताना त्यांना गाठत हल्लेखोरांनी स्टम्पने मारहाण केली. यात संदीप यांच्या हाताला फ्रॅक्चर झाले तर, पाठीला दुखापत झाली. त्यांना तातडीने हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी रुग्णालयात जाऊन त्यांचा जबाब नोंदवला. चार अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. उपचारानंतर देशपांडे यांना घरी पाठवण्यात आले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे, अमित ठाकरे यांनी देशपांडेंची रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी संदीप यांची फोन वरून विचारपूस केली. तसेच योग्य कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

मुंबईतील दादर शिवाजी पार्क येथे संदीप देशपांडे यांच्यावर अज्ञातांनी भ्याड हल्ला केला. स्टम्पच्या साहाय्याने त्यांना मारहाण करण्यात आली. हल्यांनंतर त्यांना रुग्णालयात आणण्यात आले. यानंतर रुग्णालयात मनसे अध्यक्ष राज ठाकरे, मनसे विद्यार्थीसेना प्रमुख अमित ठाकरे आणि शालिनी ठाकरे यांनी संदीप यांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली. रुग्णालयातून बाहेर आल्यावर ”आम्हाला घाबरवायचा प्रयत्न करू नका. यात कोण आहे हे सर्वांना माहित आहे, अशी प्रतिक्रिया संदीप देशपांडे यांनी दिली. दरम्यान, मनसेचे अनेक नेते, कार्यकर्त्यांनीही त्यांची भेट घेतली. मनसे नेत्यांसह इतर विरोधी पक्षनेत्यांनी या हल्ल्याचा निषेध करत संतप्त प्रतिक्रिया दिल्या.

यावर बोलताना विरोधी पक्षनेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांनी ”सर्वसामन्यांचे सरकार असले की, असेच होणार” असा खोचक टोला सरकारला लगावला. ”संदीप देशपांडेंवरील हल्ला आणि मला येणाऱ्या धमक्यांमध्ये समान धागा आहे का,” अशी शंका भाजप प्रदेश अध्यक्ष आशिष शेलार यांनी व्यक्त केली. तसेच त्यांनी चौकशीची मागणीही केली.

”या महाराष्ट्रात हल्ले होणे हे चांगला कायदा सुव्यवस्थेचे लक्षण नाही, अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी केली. या प्रकरणी ”गृहमंत्री म्हणून फडणवीस कमकुवत आहेत,” अशी टीका ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी केली. ” माझ्यावर आरोप करून, उद्धव ठाकरेंची नक्कल करून त्यांनी पक्ष वाढवला,” असे म्हणत आदित्य ठाकरेंनी खोपकर यांच्या आरोपानंतर पलटवार केला.

Scroll to Top