मुंबई :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे ६ मे रोजी कोकण दौऱ्यावर जाणार आहेत. याबाबत आज राज ठाकरेंच्या निवासस्थानी शिवतीर्थावर मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत दौऱ्यासंदर्भात चर्चा करण्यात आली, अशी माहिती मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिली. मनसेच्या या घोषणेवरून राज ठाकरे पक्ष बांधणीच्या कामासाठी सक्रीय झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे या दौऱ्यामुळे मनसेला आगामी निवडणुकांमध्ये किती फायदा होतो हे येणाऱ्या काळातच पाहायला मिळेल. ‘महाराष्ट्रातील सत्ता माझ्या हातात द्या, मग तुम्ही बघाच महाराष्ट्र कसा करतो’, असे वक्तव्य राज ठाकरेंनी मागील कोकण दौऱ्याच्या सभेत केले होते. दरम्यान, राज ठाकरेंच्या या दौऱ्याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
बीडीडी चाळ रहिवाशांना
राज ठाकरें दिला सल्ला
मुंबईत बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाची प्रक्रिया सुरु झाली असली तरी बीडीडी चाळींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांचे काही प्रश्न आहेत. यासंदर्भात बीडीडी चाळीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांनी आज राज ठाकरे यांची शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी रहिवाशांनी त्यांचे प्रश्न राज ठाकरेंसमोर मांडले. राज ठाकरेंनी त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर बीडीडी चाळीत राहणाऱ्या रहिवाशांना प्रश्न मार्गी लागल्या शिवाय कोणीही घर सोडायचे नाही असा सल्ला दिला.